भजनी मालिका

भजने

ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ॥१॥ समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसें महिमान नाहीं कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥ वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होईल भाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारुनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥ म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें । आजि माझिया उपेगा येणे । बाळ कृष्ण्‍ वधणें भलत्यापरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥ उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसे सुखरुप दोघे चालताती मार्गीं । परी चित्त पांडुरंगीं नामयाचें ॥१॥ क्षणाक्षणा वास परतोनी पाहे । वियोग न साहे पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरीचि होउनी ठेले एकाएकीं ॥१॥ आप पर तया न दिसेचि पाहतां । विश्वीं एकात्मता अवलोकीती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसें हें वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसें अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥ हा शब्द अलोलिक । श्रवणीं झालें सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसें हो असतां देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली ॥१॥ भय तें मानुनी स्त्री पाठवी माहेरा । होता तो उदरा भक्तराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ओढळातें सुणें बैसे विहिरणी । तेथें काय गुणी प्रगटेल ॥१॥ देव खादलें ते काय करी जाणा । सर्व अवगुण तयापासीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें ॥१॥ त्याचिये कृपेचें अदभुत सामर्थ्य । दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥ नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम