भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे संतोषले देव । प्रसन्नरुपें माधव

aise santoshale dev | prasannarupen madhav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसे संतोषले देव । प्रसन्नरुपें माधव । मग बोलती ज्ञानदेव । विठठलाप्रती ॥१॥ धन्य धन्य तूं विठ्ठला । धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला । धन्य समारंभ येथिला । सोहळा करिसी भक्तांचा ॥२॥ तुझेनि आम्ही धन्य । ये जगत्रयीं देवा मान्य । म्हणती भक्तांसमान । न देखों त्रिभुवनीं ॥३॥ तूं विश्वात्मा विश्वरुप । तूं जगाचें स्वरुप । तुज न लिंपे पुण्यपाप । सदा शुद्ध बुद्ध अससी ॥४॥ तूं आम्हां भक्तां सरिसा । सवें हिंडसी जगदीशा । तुजविण अष्टदिशा । मज शून्य वाटती ॥५॥ तरी तूं पाळिसी भक्त लळा । केला समाधीचा सोहळा । तो दाखविला मज डोळा । दिव्य दृष्टी देवोनी ॥६॥ तूं सत्वरजतमात्मक । तूं सकळ जीवांचा चालक । तूंचि त्रिमूर्ती अवघा एक । विराटस्वरुप सकळ ॥७॥ भक्तभाग्य भूमींतळीं । याकारणें तूं वनमाळी । दहा अवतार भूमंडळीं । नाना चरित्रें खेळसी ॥८॥ ऐसें महिमान अगाध । तें तुझें विश्वस्वरुप प्रसिद्ध । कोण भाग्याचा मी प्रबुद्ध । तो तूं मजकारणें आलासी ॥९॥ नामा म्हणे ज्ञानदेवें । ऐसी स्तुति केली स्वभावें । तंव कृपा करुनियां देवें । अभयकर दीधला ॥१०॥