भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें हो असतां देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली

aisen ho asatan dev khele mela | sahit gopala chal keli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें हो असतां देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली ॥१॥ भय तें मानुनी स्त्री पाठवी माहेरा । होता तो उदरा भक्तराज ॥२॥ अकस्मात्‌ वाटे नारद भेटला । उपदेश केला दैत्यपत्नी ॥३॥ हरिमंत्र शुद्ध पडतां श्रवणीं । गर्भस्थ ते क्षणीं स्वहित मानी ॥४॥ आठवीत नाम ह्रदय गुंफेंत । कालें तो प्रसूत होता झाला ॥५॥ आनंदें भरित मेदिनी भरली । राजा मात आली पुत्र झाला ॥६॥ भिकार्‍यासी दान सभाग्यें करूनि । संतोषला मनीं दैत्यभूप ॥७॥ देव होते करीत अनुष्ठान सिद्धी । झाला भक्तनिधी महाराज ॥८॥ स्वर्गीं ध्वज केलें उभे देवें सर्व । आनंद वैभव संतोषोनि ॥९॥ ऐशापरी बाळ पावतां वृद्धीसी । पंच कर्म त्यासी संस्कार ॥१०॥ मग करवी त्याला विद्या अभ्यासाला । गुरु शुक्र झाला सांगावया ॥११॥ शंडामर्क नामें शिक्षेसी ठेविला । पढूं तो घातला कुमरवर ॥१२॥ समस्त ते बाळ पढती जें कांहीं । गुरूचे ते ठायीं भावयुक्त ॥१३॥ प्रल्हादासी पूर्वीं गर्भवास झाला । उपदेश फळला नारदचा ॥१४॥ त्याचि छंदें गात हरिनाम अंतरीं । वाचेमाजी हरि आठवीत ॥१५॥ गुरु वैरभाव सांगत हरीचा । न मानी तयाचा उपदेश ॥१६॥ समस्तां बाळकां सांगे हरिनाम । प्रेमें तो आपण वाखाणीतो ॥१७॥ तेणें तीं लेंकुरें हरिरूप जपतांची । हरिरुप साचीं झालीं पाहा हो ॥१८॥ गुरु करी चिंता काय रायाप्रती । जाऊनि निगुती सांगों आतां ॥१९॥ आपण तो कांहीं न शिके बोलिलें । समस्त लेंकुरें नाशियेलीं ॥२०॥ जाऊनि हे मात रायासी निवेदी । कोप करुनि आधीं राजा बोले ॥२१॥ मग म्हणे आणा अधमासी येथें । गुरुराज पंथें नेत जात ॥२२॥ नाहीं कांहीं भय चिंतनीं हरीचे । आनंद करीत साचें चालिला तो ॥२३॥ नामा म्हणे ऐसा भक्तराज बळी । स्मरे वनमाळी ह्रदयांत ॥२४॥