भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

भक्तिचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ।।१।। ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविन माथा ।।२।।

कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥ ओंवाळूं गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥

उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचे गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥

माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥ चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां हो कळवळ तुम्हां उमटेचिना ॥१॥ आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आसे चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥

बोलोनियां दाऊंकां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥

कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥ लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥

जळो माझें कर्म वायां केली कटकट । झालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥ आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥

जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥ आतां मज साह्य येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥

तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजिपाशीं । आतां दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥ध्रु.॥

कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥ कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥

चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोराच्या दैवें ॥ध्रु.॥

वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥

येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥