भजनी मालिका

भजन

चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोराच्या दैवें ॥ध्रु.॥

वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥

येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥ येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥

येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥