भजनी मालिका

भजने

काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥ महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥ आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥ देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय सांगूं तुझी करणी नारायणा । वेदपारायणा के – शिराजा ॥१॥ पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परी पंढरिची सर एका नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥ कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥ सर्वकाळ वाचे उच्चारितां हरी । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥ जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये मुखीं रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥ जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा