भजनी मालिका

भजने

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥ घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक । साधनें आणिक करुं नका ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीची मात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनीं नाचे देव ॥१॥ नामाच्या गजरें नाचताती संत । सुरवरांचा तेथें काय पाड ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥१॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीची वारी आहे ज्याचे घरीं । तोचि अधिकारीं धन्य जगीं ॥१॥ आपण तरुनी तारितसे लोकां । भुक्ति मुक्ति देखा तिष्ठताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखीं नाम ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीची वारी जयाचिये कुळीं । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥ तेणें त्रिभुवनीं होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्तिचारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचे जन अवघे पावन । ज्या जवळी निधान पांडु-रंग ॥१॥ विठ्ठलनामें घेणें विठठलनामें देणें । विठठलनामें करणें सकळ काम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें प्रेम आहे त्यांचे जीवीं । त्यांची नित्य नवी करीन आशा ॥१॥ ते माझे सोइरे सुखारे सद्नुरु । भवसिंधुचा पारु उतरतो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणें संगें ॥१॥ जपतप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म । हें जाणताती वर्म संतजन ॥२॥

पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥ भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें । भावें अनुसरले विठठल- पायीं ॥१॥ काया वाचा मन रंगलें चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा ॥१॥ आणितां अनुमाना न पवे सरी । महिमा न कळे थोरी सहस्रमुखा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥ भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव