भजनी मालिका

भजने

तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझें प्रेम माझ्या दाखवीं मनातें । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥१॥ कासया शिणविसी थोडिया कारणें । काय तुझें उणें होईल देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥ मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझ्या प्रेमाचे कारणे । म्हणे म्यां घेतलें धरणें ॥१॥ विठा देगा झडकरी । मी तर न सोडीं निर्धारीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे ॥१॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥ महा पापराशी तारिलें अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ