भजनी मालिका

भजने

नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥ नामपाठ गाय सर्व भावें मनीं । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गाये सदोदित मनीं । यमाची जाचणी नोहे तया ॥१॥ नामपाठ भावें आदरें जो गाये । सर्व सुख पाहे तया होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गीता नामपाठ गीता । नाम पाठ गीता गाय सदा ॥१॥ हाचि बोध सोपा अर्जुना उपदेश । नामपाठें क्लेश सर्व गेले ।२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं ॥१॥ गोविंद नाम गाय गोविंद नाम गाय । गोविंद नाम गाय हृदयीं सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ जपे भोळा महादेव । देवाधि देव वंदी तया ॥१॥ विष तें अमृत नामपाठें झाले । दैन्य दुःख गेलें नाम जपतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ जया नाही पैं सर्वथा । तयासी तत्त्वतां यमदंड ॥१॥ मारिती तोडिती यमाचे ते दूत । नामपाठीं चित्त कां रें नेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ जागीं सोपें तें साधन । म्हणोनि वर्णन वैष्णव करिती ॥१॥ आनंदे नाचती टाळी वाजविती । नामपाठ गाती सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ ज्ञानदेवी नामपाठ तूं करीं । चुकें वेरझारी चौर्‍यांशीची ॥१॥ ऐसें वर्म सोपें सांगो जगा गुज । ज्ञानेश्वरी निजीं जपों आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ त्रिविक्रम वदे तूं रे वाचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥१॥ बळीये द्वारी त्रिविक्रम उभा । नाम पाठें उभा तुजपुढें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाच तो काळ नारायण ॥१॥ नारायण गाय नारायण ध्याय । नारायण पाहे सर्वाठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ नित्य एक नेमें गायें । हरिकृपा होय तयावरी ॥१॥ अंतरीं बाहेरी रक्षी नारायण । आलिया विघ्न निवारी साचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ पसारा घे रे मुखें सदा । कळिकाळाची बाधा तुज नोहे ॥१॥ नाम तें सोपें नाम तें सोपें । नाम तें सोपें विठ्ठलाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ प्रेमें सांवता तो गाये । हृदयकमळी वाहे नारायण ॥१॥ नामपाठ निका नामपाठ निका । खुर्पु लागे देखा देव त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥ नामपाठ भावस भक्ति तें कारण । आणिक साधन नाहीं दुजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ मच्छिद्र गोरक्षातें बोधी । तोडिली उपाधी चौदेहांची ॥१॥ नामपाठ मोक्ष मार्ग तो सर्वदा । वाचे गातां बाधा नोहे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ मंत्र सर्वांत पैं श्रेष्ठ । तेणें तें वैंकुठ सरतें केलें ॥१॥ नामपाठें साधे साधन तत्त्वतां । मोक्ष सायुज्यता हातां लागें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ यश कीर्ति नामपाठें । तो जाय वैकुंठा हेळामात्रें ॥१॥ न करी रे जना आळस मानसीं । नामपाठ अहर्निशी जपे सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ युक्ति जगीं सोपी जाणा । म्हणोनि नारायण आठवावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । जन्ममरण खेपा दुर होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ युक्ति भाविकां प्रतीती । लोभिया विरक्ती नामपाठें ॥१॥ नामपाठें याग नामपाठ योग । नामपाठें भोग सरे आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ वर्म सोपें आहे जाणा । चिंती नारायणा नामपाठें ॥१॥ अष्टांग योग साधनें वरिष्ठ । नामपाठेंविण कष्ट होतीं जना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ