भजनी मालिका

भजने

कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें ॥१॥ सांडूनि सर्व संगु होईन शरणागत । करिती मनो-रथ पूर्ण माझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलिया ॥१॥ आतां मज भय नाहीं पैं कोणाचें । जन्ममरणाचें दुःख गेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज ॥१॥ बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा स्थिर केला जीव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृपेच्या सागरेम भक्तकरुणाघनें । देऊन आलिंगनें निवविलें तयातें ॥१॥ सर्गज्ञाचा रावो आत्मा ज्ञानदेवो । सांगेल अनुभवो तुम्हांप्रती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्ण अनुसंगें रंगली कामिनी । कामधामें गेलीं गुणां विरोनी ॥१॥ होती बहुत जन्में वियोगें शिणली । आप नाठवे पर सुखें मिनली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी । एकी त्या कवळ करीं । एकीं त्या आलिया मार्जन शिरीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कृष्ण गौळियाचे लोणी चोरी । तंव अवचिता शेंडी सांपडली हरी । घेवोनी आलिया बाहेरी । तंव यशोदे वोसंगा ॥१॥ चाकाटलिया गौळणी । देवो विसरल्या गार्‍हाणीं । लाजें मौन्य धरोनी । अवलोकिती गोविंदा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृष्ण ध्यातां चित्तीं कृष्ण गातां गीतीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । म्हणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कृष्ण परमात्मा श्रीहरी । बळिराम शेषअवतार निर्धारी । कैसे शोभले अलंकारीं । निजांगाचियें निज प्रभे ॥१॥ मुगुट कुंडले विशाळ डोळे । जैसी विकासलीं सूर्यकमळें । अंगकांती रुप सांवळें । पीतांबराची परिधानें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्ण बळराम उठिले । मुखमार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठी ॥१॥ गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते । मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्नताटें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्ण बळियामाजि बलिष्ट । कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ । तैसाचि बळिरामही उध्दट । भरील घोट देखतां ॥१॥ एक नवनागसहस्त्रबळीं । दुजा तंव ते कल्पांत शुळी । येतांचि येथें निमिष मेळीं । करितील संहार कंसाचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम