भजनी मालिका

भजने

स्वमुखे चि तुह्मीं सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥ निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वयंप्रकाशामाजीं केलें असें स्नान । द्वैतार्थ त्यागुन निर्मळ जाहलों ॥१॥ सुविद्येचें वस्त्र गुंडोनि बैसलों । भूतदया ल्यालों विभूती अंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वयें घरदार प्रपंच मांडिला । जोडूनियां दिला बाळा हातीं ॥१॥ तैसें सर्वांभूतीं असावें संसारी । प्राचीनाची दोरी साक्ष आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्वयें पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वरुप सुंदर अति विशाळ । नेत्रीं निघती अग्निज्वाळ । हृदयावरी सर्पाची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ ॥१॥ वाचे वदे हरहर शब्द । तेणें निरसे भवबंध ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वरुपीं पाहतां बिंबीं बिंब उमटे । तें मेघ:श्याम दाटे बुंथि मनीं ॥१॥ चित्त वित्त हरि जाला वो साजणी । अवचिता आंगणीं म्यां देखियला ॥ध्रु०॥

स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्र पाळी पिंड देखा । शेषासरिखी बैसका । जो आधार तिही लोकीं ॥१॥ लिंग देखिलें देखिलें । त्रिभुवनीं विस्तारलें ॥२॥

स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्हीं ताळे उदर । विराटले थोर विश्वरुप ॥१॥ समाधिसंजीवन निवृत्ती फावले । तें निधान देखिलें आम्ही तुम्ही ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्वर्ग मृत्यु पाताळ सर्वावरी सत्ता । नाहीं पराधीनता जिणें आमुचें ॥१॥ नाहीं त्या यमाचे यातनेंचे भय । पाणी सदा वाहे आमुचे घरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वर्गासुख आम्ही मानुं जैसा ओक । सांडुनियां सुख पंढरीचें ॥१॥ पंढरीं पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥ नारायणा नामें होऊं जिवनमुक्त । कीर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम