भजनी मालिका

भजने

नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे तें तीर्थ । वदे तूं चितारहित सर्वकाळ ॥१॥ काळाचें तें काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ । पावें तो वैकुंठकलीमाजीं ॥१॥ नामपाठें गेलें नामपाठें गेले । जडजीव उद्धरिलें नामपाठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ सत्ता सर्वां वरिष्ठाता । यमधर्म माथां वंदी पाय ॥१॥ ऐसा नामपाठ भक्तियुक्त गाय । पुनरपि नये संसारासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ सदा एकांती जो करी । भुक्तिमुक्ती चारी घरीं त्याच्या ॥१॥ न लगे साधन व्युप्तत्ति पसारा । नामपाठ बरा संतसंगे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ साधन याहुनी आहे कोण । कासयासी पेणें स्वर्गवास ॥१॥ जन्म देई देवा जन्म देई देवा । गाईन मी देवा नामपाठ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ सार वेदांचें तें मूळ । शास्त्रांचे तें फळ नामपाठ ॥१॥ योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठें स्पष्ट सर्व कार्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥ चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम ॥१॥ नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्त्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा ॥१॥ नामपाठें सिद्धि नामपाठें सिद्धि । तुटेल उपाधी नामपाठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठ स्नान नामपाठ दान । नामपाठ ध्यान जनार्दन ॥१॥ नामपाठ संध्या नामपाठ कर्म । नामपाठें धर्म सव जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठविठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचेंजालें जालें ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वदतां वो वाचे । सार्थक जन्माचें झालें साचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें अक्रुर सर्व ब्रह्मारुप । भेदाभेद संकल्प मावळले ॥१॥ वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैतांचे बंधन तुटोनी गेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें आपण होय अनामिक । नामपाठें देख न म्हणे कांहीं ॥१॥ उंच नीच ज्ञाती न करी विचार । नामपाठें निर्धार ऐसा ज्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें ॥१॥ अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें क्रिया नामपाठें कर्म । नामपाठें वर्म हातां येत ॥१॥ तो हा सोपा योग नामपाठ वाचे । न करी सायासांचे वर्म कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें ॥१॥ नामपाठें ध्रुव अढळपदीं बैसें । नारद नाचतसे नामपाठे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला परब्रह्मा ॥१॥ नामपाठ ब्रह्मा नामपाठ ब्रह्मा । आणिक नेणें कर्म वर्म नामेंविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें गीता ज्ञानेश्वरी होय । स्मरे तूं निर्भय ज्ञानदेवी ॥१॥ नामपाठें सोपीं अक्षरें ती उच्चार । ज्ञानेश्वरी उच्चार करी वाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें गुण झाले पैं त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठें ॥१॥ सैरा सैराट धांवे जे वाटा । तयाच्या चेष्टा न चलती तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें गोरक्ष वोळगला गहिनी । दाविली उन्मनी सर्वकाळ ॥१॥ समाधि आसन सैरा ते बोल । नामपाठ मोल अभ्यासिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ