भजनी मालिका

भजने

देवा माझे मन लागों तुझें चरणी । संसारव्यसनीं पडों नेदी ॥१॥ नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाची भ्रम नको देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥ जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचा भक्ती तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥ निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न म्हणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥ गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंद्रियांचे ॥१॥ सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ॥१॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥ संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥ हातावरी हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणीं रत व्हावें सर्वदा ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम