भजनी मालिका

भजने

नाकळे जो आकळ । भक्तिप्रेमाचा वत्सल । रूप धरूनि कोमळ । भीमातटीं उभा ॥१॥ त्याचा छंद असो जनी । काया वाचा आणि मनीं । संचिताची हानी । कदा काळीं न होवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाकळें तें कळें कळे तें नाकळे । वळे तें नावळे गुरुविण ॥१॥ निर्गुणीं पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाकीं तोंडी वाहे रुधिर । हातापायांचा झाला चूर । मस्तक मेंदु उसळे बाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥ तया देऊनि उतम गती । आनंदें बळरामश्रीकृष्ण्‍ नाचती । तांडव विसरे उमापति ॥ कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नागर गोमटें रुप तें गोजिरें । उभे तें साजिरें भीमातटीं ॥१॥ पहातां विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नागवे कळिकाळां ब्रिदावळी पाही । तोचि लव-लाहीं ध्यायिजेसु ॥१॥ स्मरण विठ्ठल चित्त पांडुरंग । नाहीं तया मग जन्ममरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाचताम उडतां रडताम पडतां । नाम्या अवचितां हातां आला ॥१॥ येतां जातां हरि हरि हरि वाटे । नाम तें चोखटें स्मरा मुखीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाचेन आनंदें विठ्ठलनाम छंदें । परते भेदाभेद सांडोनियां ॥१॥ जाईन पंढरीं नाचेन महाद्वारी । वाचे हरि हरि रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाठवीता स्वयें दयावी आठवण । ते तों आहे खूण सद्गुरुची ॥१॥ ऐशिया प्रकारें बोधवितां शिष्या । अंतरीं प्रकाशा काय उणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाठवेचि दुजें कानड्यावांचुनी । कानडा तो मनींध्यानी वसे ॥१॥ कानडा कानडा विठ्ठल कानडा । कानडा विठ्ठल कानडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥१॥ महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाथिलाचि देह नाथिला प्रपंच । नाथिली कचकच अवघें वांव ॥१॥ नाथिलेंचि दान नाथिलाचि धर्म । नाथिलेंचि कर्म नाथिलें हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ