भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन

paha ho kalichen mahiman | asatyasi rijhalen jan

पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥१॥ ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥२॥ थोर य युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार । सांडूनिया द्विजवर । दावला पीर स्मरताती ॥३॥ ऐसें यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ । नाहीं ऐसी झाली नीत । हाहा भूत पातलें ॥४॥ शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया । ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगलें ॥५॥ राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म । म्हणवितां रामराम । महा श्रम मानिती ॥६॥ येर भोरप्याचेविशीं । धांवती भूतें आमिषा तैसीं ॥ कथा पुराण म्हणतां सिसी । तिडिके उठे नकरियाची ॥७॥ विषयलोभासाठीं । सर्वार्थेसी प्राण साटी । परमार्थी पीठ मुठीं । मागतां उठती सुनीसी ॥८॥ धनाढ्य देखोनि अनामिके । तयांतें मानिती आवश्यक । अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्विक संपन्न ॥९॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनाचिया दासी । सासा झाल्या आंदण्य ॥१०॥ खोटें झाले आली विवसी । केली मर्यादा नाहींसी । भार्या ते भ्रतारासी । रंक तैसी मानिती ॥११॥ नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाठीं खौसा । वंदिती म्लेंच्छाच्या ॥१२॥ बहुत पाप झालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ । अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरिती कोणाचा ॥१३॥ कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । विडे घेऊनि ब्राह्मण । अविंधवाणी वदताती ॥१४॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासींचीं चुंबिती । सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१५॥ मद्मपानाची शिराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवल्या व्यभिचारिणी दैन्यावाणी पतिव्रता ॥१६॥ केवढी दोषाची सबळता झाली पाहा हो भगंवता । पुण्य धुडावोनी संतां । तीर्थां हरी आणिली ॥१७॥ भेणें मंद झाली मेघवृष्टि । अकांतली कांपे सृष्टी । देव रिघाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१८॥ अपीकें धान्य दिवसेंदिवसें । गाई म्हैसी चेवल्या रसें । नगरें दिसती उदासें । पिकलीं बहुवसें पाखाडें ॥१९॥ होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादि साधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥२०॥ अठरा यातींचा व्यापार । करिती तस्कराई विप्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२१॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं । अश्वाचियेपरी विकिती । कुमारी वेदवक्ते ॥२२॥ वेदाध्ययनसंहितारुचि । भकांद्या करिती तयांची । आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२३॥ मुख्य सर्वोत्तम साधनें । ती उच्छेदुनि केलों दीनें । कुडीं कपटी महा मोहनें । शठ दुर्जनें मिरविताती ॥२४॥ कलाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं । विधिनिषेधाच्या वाही । एकही ऐसीं नाडिलीं ॥२५॥ जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होती वैरागी दिगांबरी । निस्पृही कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरीं न सुटती ॥२६॥ कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक । पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें वर्तताती ॥२७॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविले अवघें जन । याती अठरा चार्‍ही वर्ण । कर्दमकरूनि विटाळविले ॥२८॥ पूर्वीं होतें भविष्य केलें । संतीं तें यथार्थ झालें । ऐकत होतों तें देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥२९॥ आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्यें वावरावें । देवाशी भाकोनी करुणारवें । वेगें स्मरावें अंतरीं ॥३०॥ अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसी या कौतुका । धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३१॥