भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालासी हरिभक्त तरी आम्हां

jhalasi haribhakta tari amhan

झालासी हरिभक्त तरी आम्हां । काय आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥ घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी । हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणें ॥२॥ गुरुविण तुज नव्हेचि गा मोक्ष । होशिल मुमुक्षु साधक तूं ॥३॥ आत्मतत्त्वी दृष्टी नाहींच यां केली । तंववरी ब्रह्मबोली बोलुनि काय ॥४॥ तुझें जरी रूप तुवां नाहीं ओळखिलें । अहंतेतें धरिलें कासयासी ॥५॥ आमुचें तूं मूळ जरी पुसतोसी । तुझें तूं अपेशी पाहुनि घेई ॥६॥ ऐक रे नामया होई आत्मनिष्ठ । तरीच तूं श्रेष्ठ ज्ञानी म्हणे ॥७॥