भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी त्वां कोणाचें बरवें केलें । पूर्ण आम्हां कळों आलें

hari tvan konachen baraven kelen | purna amhan kalon alen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
हरी त्वां कोणाचें बरवें केलें । पूर्ण आम्हां कळों आलें ।।१।। नारद वैष्णव जगजेठी। त्यासी लाविली लंगोटी ।।२।। मयुरध्वज राजा भला । त्यासि करवतीं घातला ।। ३।। बळी दानशीळ भला । तुवां पाताळ घातला || ४ || भीष्म वैष्णवांचा राव त्याचा बाणें पूजिला ठाव ॥५॥ रूक्मांगद हरिचा दास त्याचा गांवच केला वोस ।।६।। बाळ एकुलतें एक। तें त्वां ज्ञानीच केला शुक ।।७।। उपमन्यु बाळक पाहें। क्षीरसागरीं कोंडिलें आहे ॥८॥ धुरू बाळक गोजिरवाणें । त्याचें खुंटलें येणें जाणें ।। ९ ।। हरिश्चंद्र ताराराणी । डोंबा घरीं वाहे पाणी।।१०।। प्रल्हाद भक्तीचा भुकेला । त्याचा बाप त्वां वधिला ।।११।। हनुमंत भक्त निकट । त्यासी केलें तूं मर्कट ।। १२ ।। पुण्यवंत राजा नळ । त्याचा केला तुवां छळ ।।१३।। श्रियाळ राजा भला त्याचा बाळ त्वां खादला ।।१४।। तुज कोणी न म्हणे भलें बाळ पोटीचे कोवळें ।। १५ ।। जिकडे तिकडे तुम्ही दोघे तिकडे तिसरा नामा मागें ।। १६ ।। तुज नाहीं जाती कुळ । जेऊनि भ्रष्टविलें बाळ ।।१७।। जेणें तुझें नाम घेतलें । तें संसारावेगळे केलें ।।१८।। आतां जेविसी तरी तुज आण ऐकोनि हांसे जगज्जीवन ।। १९।। नामा दिला माते हातीं । नयन भरले अश्रुपातीं ||२०|| माय पाहे नामदेव । तंव तो जाला केशवराव ।। २१ ।। माय म्हणे नये कामा । तुझा ओपिला तुज नामा।। २२ ।। गोणाई म्हणे हरी तुझी करणी तुजचि वरी ॥ २३ ॥