भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी परम ध्यानीं बैसलिया जाणा । कांहीं या रे मना विश्रांति नुपजे

yogi param dhyanin baisaliya jana | kanhin ya re mana vishranti nupaje

रचनाकार: संत नामदेव · अभंग
योगी परम ध्यानीं बैसलिया जाणा । कांहीं या रे मना विश्रांति नुपजे ॥१॥ तुजवीण दुसरें कांहींच नाठवे । लागली तुझी सवे विष्णुदासा ॥२॥ कवण कुळीं तूं जन्मलासी नामा । केशव परमात्मा तुज जवळी ॥३॥ धेनु वसे वनीं वत्स असे घरीं । चित्त तयावरी ठेवुनी चरे ॥४॥ ते तया देखोनी संतोषली मनीं । तैसा तुझ्या गुणी वोल्हावलों ॥५। तीर्थयात्रें जाणे न लगे कांहीं करणें । ऐकोनी तुझें गाणें सुखरुप ॥६॥ वेडावल्या श्रुतिस्मृति आणि पुराणें । योगियांची ध्यानें विसर्जिलीं ॥७॥ तुझें प्रेम सांडावें आणि मनें कोठें जावें । जावोनियां पाहावें काय कोठें ॥८॥ समाधिसोहळा लय लक्ष वैराग्य । आम्हांलागीं भाग्य आणियेलें ॥९॥ ऋषि गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व । लक्षिताती ठावो अरुपाचा ॥१०॥ तो तुवां आम्हां सन्मुख उभा केला । चरणासी लागला ज्ञानदेव ॥११॥