भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली

yetase dasharath sumitramandirin | dekhatan samori yeti jhali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥ न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥ घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगीं लेपन तीर्थोदकें ॥३॥ गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥ कैकयीचें दु:ख विसरला राव । पाहोनियां भाव सुमित्रेचा ॥५॥ होती जे डोहळे तुझिये मानसीं । सांग मजपाशीं पतिव्रते ॥६॥ प्राणनाथा ऐसें वाटतसें जीवा । वडिलांची सेवा अहर्निशीं ॥७॥ आवडे हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८॥ ऐकतांचि ऐसें कांते़चें वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥ घेऊनियां हातीं रत्नाचें भूषण । टाकी ओंवाळून नामा म्हणे ॥१०॥