भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारीं भवव्यथे पांडुरंगे

yei vo krupavante anathanche nathe | nivarin bhavavyathe pandurange

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारीं भवव्यथे पांडुरंगे ॥१॥ मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु । करीं माझा सांभाळु पंढरिराया ॥२॥ माझें माहेर पैं नित्य आठवे अंतरीं । सखा विटेवरी पांडुरंग ॥३॥ मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्म तूं अन्न । मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगा ॥४॥ मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा ॥५॥ मी धनलोभी शुंभ तूं पूर्ण कनक कुंभ । मी मगर तूं अंभ पांडुरंगा ॥६॥ मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तूं बोध । मी शुष्क नदी तूं ओग पांडुरंगा ॥७॥ मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक । मी प्रजा तूं पाळक पांडुरंगा ॥८॥ मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी । मी अपत्य तूं जननी पांडुरंगा ॥९॥ मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय । मी आडळ तूं साह्य पांडुरंगा ॥१०॥ ऐसी जे जे माझी विनंती ते तुजचि लक्ष्मीपती । निज सुख सांगाती पांडुरंगा ॥११॥ शीघ्र येई वो श्रीरंगे भक्त मानस घे गे । प्रेमपान्हा दे गे नामदेवा ॥१२॥