भजनी मालिका
← भजनांकडे परत

यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु । चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मल्ल उभे

yavari pudhil karyarthu | sadhavaya shrikrushnanathu | chalile rajabhuvana antu | tanv daravanta samasta malla ubhe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु । चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥ म्हणती कोठें रे करुनियां मेळ । चालिला ते अवघे गोवळ । नेणोनियां राजाज्ञा बळ । जैसे टोळ सैराट ॥२॥ पाठवा पुढें कृष्ण तोचि । आणील परवानगी तो रायाची । तंव गोवळ म्हणती रे हें वायाची । जल्पतां मराल येचि क्षणीं ॥३॥ परवानगीये एकचि ठावो । बळिराम अथवा कृष्णदेवो । सांडूनियां कंसरावो । रिघा रे शरण वांचाल ॥४॥ तंव तें म्हणती हीं कच्चीं पोरें । चणचणा बोलती न्यायनिष्ठुरें । भयचि हीं गव्हारें । आपटा एकदोनी धरुनियां ॥५॥ त्यांचियां कैवारा कृष्णनाथ । येईल आपोआप धांवत । मग करुनियां वरवळां समस्त । त्यासीहि वधूं निमिषार्धे ॥६॥ निळा म्हणे चिंतुनी ऐसें । घांविले गोवळांवरी अति आवेशें । तंव ते ओढिले नांगरपाशें । बळिरामें एकदांचि कवळिनें ॥७॥