भजनी मालिका
← भजनांकडे परत

यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे थांबोनी । जाईल बाळका झडपोनी । कैसे करुं हे राक्षसी

yashoda mhane he rajabhagini | kan pan alise thamboni | jail balaka jhadaponi | kaise karun he rakshasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे थांबोनी । जाईल बाळका झडपोनी । कैसे करुं हे राक्षसी ॥१॥ बहुत उपचारेंसी पूजिली । पूतना सन्मानें बैसविली । मग ते म्हणे ये यशोदे भली । पुत्रवंती झालिसी ॥२॥ आणि नाही सांगोनियां धाडिलें । ऐंसें निष्ठुरपण त्वां धरीलें । श्रवणीं ऐकतांचि धावोनियां आलें । आनंदले ह्रदयांत ॥३॥ आणिली विचित्र बाळलेणी । बाळंतविडाही तुजलागुनी । आणीगें तान्हुलें पाहों दे नयनी । ऐकोनी यशोदा मनी गजबजिली ॥४॥ म्हणें कैसे तरी करुं ईसी । राजभगिनी हे राक्षसी । दिठाविल माझिया सुकुमारासी । दिठीचि कठीण इयेचि ॥५॥ मग म्हणे आतांचि न्हाणिलें । बाळक पालखीं निजविले । हे ऐकतांचि नवल केलें । बाळक उठलें न राहेंचि ॥६॥ निळा म्हणे पूतना तेथें । रोषें बोलें यशोदेतें । काय गे नष्टपण हें तूंते । मिथ्याचि झकविशी मजलागी ॥७॥