भजनी मालिका
← भजनांकडे परत

या परी करुनियां त्याची गती । निजधामा पाठविला श्रीपती । लोकही विस्मय पावोनि चित्तीं । न कळे म्हणती हरिलीळा

ya pari karuniyan tyachi gati | nijadhama pathavila shripati | lokahi vismay pavoni chittin | na kale mhanati harilila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
या परी करुनियां त्याची गती । निजधामा पाठविला श्रीपती । लोकही विस्मय पावोनि चित्तीं । न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥ हाचि ईशाचाही ईश । जगाचा आदी हा जगदीश । येथें दिसतो । मानुशवेश । परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥ याचिया चरित्राची नवाई । एकेक सांगावी किती काई । अगाधपणेंचि बाळत्वही । प्रथ्मचि पूतना शोषिली ॥३॥ पाठीं माभळभटासी पिढेदान । शकट पादघतेंचि उडवून । यावरी कागबग निर्दाळून । रिठासुरा चावून सांडियेला ॥४॥ अघासुरही वनीं चिरिला । वत्सासुर तो धोपटिला । धेनुक प्राणेंसी बिघडविला । तृणावर्त लाविला मृत्युपंथे ॥५॥ ऐशी दिव्य चरित्राचिया खाणी । उघडिलिया येणें बाळपणीं । पुढें जे करील तेंही नयनीं । पाहों आइकों निवाडे ॥६॥ निळा म्हणे ऐसे जन । गोकुळींचे विस्मयापत्र । पुढें केशियाचें आख्यान । तेंही सकळिक आइका ॥७॥