भजनी मालिका
← भजनांकडे परत

या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे

ya amaramaji yekhada volago mhane

या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे तरी तो ठावो ठाकितां अतिदुस्तरु । भूमंडळीचे राज्य वोळगों म्हणे तव तेथें न लभे अवसरु । नि:संग होऊनि यतिधर्म चाळूं म्हणे तरी भिक्षेसी पडे विचारु । नि:प्रपंच हातीं टाळ दिंडी घेऊनियां वोळगे तो हरिहरुरेरे ॥१॥ हरीचे विद्यावंत जालोरे आम्ही जाऊनि पंढरपुरीं राहिलों । कळिकाळाच्या माथां पाय देऊनियां वैकुंठ भुवनासि गेलोरेरे ॥ध्रु०॥ अष्टांगयोगे शरीर दंडूं पाहे तंव येवढें कैचें कष्टसाधन । लय लक्ष लावूनि गुरुमंत्र जपों म्हणो तरी स्थिर नव्हे अंत:करण । तल्लीन होऊन हरिकथा आयिको म्हणो तरी ठायींचेच बधिर श्रवण । उदंड वाचे हरिहरि म्हणतां फ़ुकासाठीं चुके पतनरेरे ॥२॥ चहुं वेदांचे गव्हर धांडोळितां वेडावलीं साही दर्शनें । शून्य स्थावर जंगम सर्वत्र व्यापून असणें । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं सरिसें या दृष्टी पाहाणें । ऐसियातें सेवितां अविद्या लोपे मा विश्वास मानिला मनें ॥३॥ जयाचिये वोळगे जातां आडकाठीच नाहीं भीतरी गेलिया भान पाविजे । अरोधे विरोधें समतुल्य देणें न मगतां अभरि देइजे । तो क्षणमाजीं दे तें नसरे कल्पकोटि ऐसिये धुरे कां दुर्‍हाविजे । ऐसियाचे गांवींची सुखवस्तीची पुरे मा बहुत काय अनुवादिजेरेरे ॥४॥ ऐसा वैकुंठपुरपति पुंडलिकाचिये भक्ती अमूर्त मूर्तीस आला । भक्तां अमरपद देतुसें अवळीला नामें यमलोक विभांडिला । जिहीं जैसा भाविला त्या तैसा पालटु दाविला परि अणु एक नाहीं वेंचला । बापरखुमादेविवराविठ्ठलु आम्हां गीतीं गातां जोडलारेरे ॥५॥