भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलु नाहीं जये शरीरीं

viththalu nahin jaye sharirin

विठ्ठलु नाहीं जये शरीरीं । वाया कांगा जन्मले संसारी । विठ्ठलु नाहीं जये नगरीं तें अरण्य जाणावें ॥१॥ विठ्ठलु नाहीं जये देशीं । स्मशान भूमि ते परियेसी । रविशशिवीण दिशा जैसी । रसना तैसी विठ्ठलेंविण ॥२॥ विठ्ठला वेगळें जितुकें कर्म । विठ्ठला वेगळा जितुका धर्म । विठ्ठला वेगळें बोलती ब्रह्म । तितुकाही श्रम जाणावा ॥३॥ सच्चिदानंदघन । पंढरिये परिपूर्ण । कर ठेवोनियां जघन वाट पाहे भक्ताची ॥४॥ विठ्ठलेंविण देवो ह्मणती । ते संसार पुढती । विठ्ठलाविण तृप्ती । नाहीं प्रतीतिविठ्ठलेंविण ॥५॥ श्रीगुरुनिवृत्तीनें दिधलें । तें प्रेम कोणे भाग्यें लाधलें । बापरखुमादेविवर विठ्ठलें । ऐसें केलें ज्ञानदेवा ॥६॥