भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी

vishvajanamohana kapatiya narayana | kay devapana miravitosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥ दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥ या विश्वावेगळें नवल तुझें करणें । सांगावें गार्‍हाणें कवणालागीं ॥३॥ सर्वांगें सुंदर परी ह्रदयें कठोर । नेणसी जिव्हार मज दुर्बळीचें ॥४॥ मज अनाथाचें बाळ वेधोनि मोहिलें । बहुत दुःख जालें सांगों कोणा ॥५॥ कासया पितृभक्ति पुंडलिकें केली । विवसी आणिली पंढरीसी ॥६॥ माय दुखवुनी मोहिसी बाळकें । देवपण निकें कैसें तुझें ॥७॥ यातें अनुसरल्या कैंची बाप माय । नाठवेची सोय संसाराची ॥८॥ ऐसियानें संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आलें मज ॥९॥ आतां माझिया जीवीचें जाणसी तें गुज । तरी काई तुज उणें होतें ॥१०॥ माझा नामा लावीं संसाराचे सोई । विनविते गोणाई केशवातें ॥११॥