भजनी मालिका
← भजनांकडे परत

वसुदेव देवकीचिये उदरी । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारी । श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री

vasudev devakichiye udari | krushna janmale mathurebhitarin | kansachiye bandishale majhari | shravan krushnashtamin madhyaratri

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वसुदेव देवकीचिये उदरी । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारी । श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥ अयोनिसंभव चतुर्भज । शंक चक्र गदांबुज । चहूं करी आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥ कासे पींतांबर कसिला । कंठी कौस्तुभ तेजागळा । श्रीवत्सलांछन शोभला । माजी मेखळा जडिताची ॥३॥ मस्तकी मुगुट रत्नखेवणी । रत्नमय कुंडलें उभय कर्णी । देखोनियां देवकी नयनीं । म्हणे या कैसोनि आच्छादूं ॥४॥ देखतां वसुदेवहि विस्मित । म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ । सायुधें भूषणे घवघवित । तेज:पुंज निजात्मा ॥५॥ देवकी लागोनियां पायांशीं । म्हणे गोकुळां नेऊनि लपवा यासी । विदित झालिया रायासी । नेदी वांचो या बाळका ॥६॥ निळा म्हणे ऐसी चिंता । जाकळुनी ठेली तया उभयतां । हें देखोनियां श्रीकृष्णनाथा । कळों सरलें ह्रग्दत ॥७॥