भजनी मालिका
← भजनांकडे परत

वडील वडील आमुची बोलतील गोष्टी । परी तुज ऐसा सृष्टीं देव नाहीं

vadil vadil amuchi bolatil goshti | pari tuj aisa srushtin dev nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वडील वडील आमुची बोलतील गोष्टी । परी तुज ऐसा सृष्टीं देव नाहीं ॥१॥ दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा । मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ॥२॥ ऐसा कैसा कोणें केलासिंरे देव । आमुच्या जाणिया खेंच आणियेला ॥३॥ माझेंज बाळ तुझ्या दर्शनासीं आलें । तें त्वां भुलविलें केशिराजा ॥४॥ रात्रिदिवसा तुझ्या नामाचा रे छंदु । गोविंद गोविंदे म्हणतसे ॥५॥ तान्ह भूक विसरला पिसाट पैं जाला । नोळखे मजला काय करूं ॥६॥ परतोनि संसाराची सांडियेली आसा । दिसतो उदास सर्वांपरी ॥७॥ लोकांचीं लेंकुरें कां गा चाळविसी । आपणया ऐसें करसी भलत्यासी ॥८॥ आणिक असतां नाश वेगळा थोर । मग माझा विचार कळतां तुज ॥९॥ तुज एक वर्म पुंडलिक आहे । जेणें जडविले पाय विटेवरी ॥१०॥ याहुनी आणिक अधिक पावसी । आम्हां दुबळयासी कष्टवितां ॥११॥ मागें पुढें तुज ऐसेंचि फावलें । तें तंव न चले मजसी कांहीं ॥१२॥ जीव मी देईन कां नामा नेईन । नांव मी करिन गोतामाजीं ॥१३॥ आतां बरवें विचारी अगा ये श्रीहरी । माझा नामा करीं मज आधीन ॥१४॥ नाहीं तरी जीवित्व वेंचिन तुझ्या पायीं । विनविते गोणाई केशिराजा ॥१५॥