भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपदेश अगोचर उपदेशी अगोचर मदलसा पुत्रालागीं रहीवासु

upadesh agochar upadeshi agochar madalasa putralagin rahivasu

उपदेश अगोचर उपदेशी अगोचर मदलसा पुत्रालागीं रहीवासु । ध्यानरुप येक करी सर्वाघटीं महेशु । जातिधर्म लोपि बा न करी तूं आळसू । उठि जाय योगपंथें जेथें वैकुंठ निवासु ॥१॥ जे जो जे जो नित्य हरि जनीं वनीं जो अहे । त्याचें तूं ध्यान करी नित्य तेथेंची राहें । परतोनी येवों नको प्रपंच न पाहे । जठराग्नीं पचों नको वेगीं तूं योगिया होय ॥२॥ जपतप वाचे एक अखंड श्रीराम उच्चार । नित्य धर्म संताचारे हाचि करीरे विचार । संगदोष बोधिती तुज म्हणोनि होई खेचर । अतळों नको द्वैतबुध्दि सदा अद्वैत निरंतर ॥३॥ एक लक्ष एक पक्ष एक तत्त्व ह्रदयीं । एक ध्यान एक मन याचे लागे तू सोयी । एक हरि हाचि खरा एक नेम तूं राही । अणिक जपों नको देवोदेवीं काहीबाहीं ॥४॥ देव तो वैकुंठींचा निरालंबीरे आहे । निराळा सर्व जीवां म्हणोनी ध्यातु आहे । जीव हा शिव करी ऐसे करुनियां राहे । रामनाम मंत्र ध्वनि कळिकाळ वास न पाहे ॥५॥ कोहं हे उपजतां टाकिलें तुवां सोहं । गर्भी होतासि सावध आतां म्हणतासि हूंहूं । अहंकार जपों नको मन मुंडि संमोहे । एकट मन करि रामनामीं धरी भाव ॥६॥ शांति करी जीवशिवी सर्व क्षरलासे हरि । क्षमा दया बहिणीं तुझ्या माया सांडी भीतरीं । बंधु पिता सखि जेंणें टाकि तूं दुरिच्या दुरी । मत्सर हा घेवों नको मद टाकी तूं दुरिच्या दुरी । मत्सर हा घेवों नकों मद टाकी हा बाहेरी ॥७॥ हरिरुप निखळ आहे योगी जाणती यासि । अंतर तें दुरांतर हें तूं जप मानसीं । कर्म हें ब्रह्म जाण ऐसा होई समरसीं । तत्काळ होशी योगी संदेह नाहीं त्यासी ॥८॥ सत्त्व रज तमीं गुंफ़ो नको एकतत्त्वीं आहे भाव । नानातत्त्वीं धरिसी व्यर्थ मग तुज न पवे देव । मी माझे वाहों नको व्यर्थ करिशी उपाव । शिणलासि येतां जातां हा तुज नाहीं आठव ॥९॥ शरीर हें नव्हें तुझें तरुण बाळरे वृध्द । जंववरी सावध आहे तंववरी करी प्रबोध । एकनामीं विष्णुचेरे जाणती तेचि सिध्द ॥१०॥ नि:शंक मार्ग चाली आडकाठी नाहीं तेथें । विहंगमी चाड धरी पिपीलिका नेघे हीत । अजप तेथें जपे सदापूर्ण अनंत । न धरी विकल्प कांही उध्दरसि त्त्वरित ॥११॥ कामना चित्तवृत्ति अनुग्रह हे उपदेश । ग्रहभूतपिशाचरे याचा नव्हे तुज त्रास । कळिकाळ पडेल तेथे पावसि परमपरेश । झणें हे पावसी शरीर न करी न करी आळस ॥१२॥ अंतीं अंत ऊर्ध्व अध दश दिशां नांदे एक । हरिविण न दिसे कांहीं संत जाणती विवेक । निरलसी त्यांची माया हरि भरला दिसे एक । नयनीं दृष्टि चोख जैसा अमृता चा मयंक ॥१३॥ योगिया तूंचि जाण योगयाग तयें हरि । न भजे हरिविण उगा नसे क्षणभरी । रामकृष्ण वाचे सदां नित्य जपे निरंतरी । हरि ध्यान ऐसें आहे पुत्रा हेंचि तूं स्वीकारी ॥१४॥ लोपतील मन संग संग भंग सांगडी । अवचिती पडेल कव जन्ममरणाची उडी न गिळे आयुष्य तुज मनुष्य जन्मअर्ध घडी उठिचि उठोनिया जाय तूं तांतडी ॥१५॥ विवेक करि बाळा पुराणप्रसिध्द पाहे । वेदशास्त्रें बोलिले हरि हें पाहोनि उगा राहे । योगिये विसावले तेथें दिव्यचक्षू करुनि पाहे । सत्रावी हे संजीवनी उलट करी लवलाहे ॥१६॥ मातृका भेदुनियां षटचक्रे टाकी वेगी । तेथें तूं गुंफ़ो नको चाल विहंगममार्गी । अनंत सिध्द गेले ऋषीमुनीच्या संगीं । नारदादि अवधुत ते प्रपंची नि:संगीं ॥१७॥ हनुमंत कपिराज भीष्मादिक उत्तम । परिक्षित प्रल्हाद ते पैं जाले आत्मराम । ध्रुव आणि अंबऋषी पावले वैकुंठ धाम । यांचा तूं संग करी होईकारे नि:काम ॥१८॥ मदलसा म्हणे पुत्रा ऐसा आहे उपदेश । भाव गर्भीचारे तुज विचरे पृथ्वी नि:शेष । सरता होई संतामाजी चित्तीं ध्याई ह्रषीकेश । परब्रह्म तूंचि होसी ऐसें बोलियेले व्यास ॥१९॥ शुक्रादिक पुत्र ज्याचे तो साक्षात नारायण । अवतरले मनुष्यवेषें तारियेले अवघे जन । ऐसाचि होई तूरे विसरे मीतूं पण । उठी जाये उर्ध्व पंथे करिल कृपा हरि आपण ॥२०॥ नाम हें अमृतसिंधु ह्रदयीं जपे सदाकाळ । नाहीं तुज रोगराई तुज देखोनी पळेल काळ । हरिसि जो विनटला तयां नाहीं काळ वेळ । नामधारकाचें तीर्थ वंदी तीर्थकल्लोळ ॥२१॥ पुत्र म्हणो अवो माते गुरु तूंची जालीसी । नसवे क्षणभरी जपतप मानसीं । हरि हा श्रेष्ठ राणा तूंची तारक जीवासी । भवार्णवीं तारियेले म्यां दृढ धरिलें मानसीं ॥२२॥ खेचर बुध्दि केली खेळिनलों चौर्‍याशीं । खुंटल्या जन्मयोनी पावलों मोक्षसुखासी । खेचराखेचर माये मी तुझा वो उपदेशी । गुरुगम्यउपदेशिलें शिष्य निवाला मानसीं ॥२३॥