भजनी मालिका
← भजनांकडे परत

उगवला दिन प्रभात । स्नान संध्या सारोनी समस्त

ugavala din prabhat | snan sandhya saroni samasta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उगवला दिन प्रभात । स्नान संध्या सारोनी समस्त । उद्वव कर जोडोनी बोलत । पूर्ण आर्त सर्वांचे ॥१॥ अनूपम इचा महिमा । न बोलवे जाहली सीमा । आताम चला वेगीं पुरुषोत्तमा । आपले आश्रमा पंढरीसी ॥२॥ गरुड सामोरा तिष्टत । भक्त भागवत समस्त । मुनी पुंडलिक विनवित । केलें दंडवत साष्टांगें ॥३॥ म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदि । वाग्‌स्नेहो वाक्बुद्धी । परंपरा याचि वैखरी । यासी मंत्रोक्त दिधली ॥४॥ ऐसाचि सोपान मार्ग । तूंचि करितां पांडुरंग । ग्राम लेखनाचा प्रसग । निरोपिला सांग कुळयाती ॥५॥ सकळवंश परंपरा । न सोडावें तुम्ही आचारा । आम्ही जातों पंढरपुरा । या विठोबा सांगातें ॥६॥ सकळां आलिंगन दिधलें । मग गरुडावरी आरुढले । ज्ञानदेवांनीं हरीची पाऊलें । दृढ धरिलीं निरंतर ॥७॥ नामा नाचे हरिद्वारीं । आनंद जाला आळंकापुरीं । विठठल देवो निघाले पंढरीं । ज्ञानदेवा समाधि देवोनि ॥८॥