भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही सदाचार महंत ब्रह्मवादी । तुमची वाग्‌नदी ब्रह्मरुप

tumhi sadachar mahant brahmavadi | tumachi vag‌nadi brahmarup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुम्ही सदाचार महंत ब्रह्मवादी । तुमची वाग्‌नदी ब्रह्मरुप ॥१॥ सत्य वचन जळ पवित्र तें निर्मळ । कृतार्थ तेणें केवळ जालोंसे मी ॥२॥ हा तुमचा विश्वास दृढ आहे मज । तुम्ही माझे पूज्य परम देव ॥३॥ स्नानाचा प्रकार आहे पंचविध । सांगेन विद्‌गद भाव त्याचा ॥४॥ अर्थीं ठेवुनी दृष्टी विवेक घ्यावा पोटीं । प्रत्यया येईल गोष्टी अनुभवाची ॥५॥ उत्तमाहुनी उत्तम सत्य वाग्‌स्नान । यापरतें पावन आणिक नाहीं ॥६॥ काया वाचा मनें हें दृढ धरिजे । हेळाची तरिजे भवसागरु ॥७॥ बाहेजु भीतरीं शुद्ध सर्वकाळ । हें दुजें निर्मळ सुद्धस्नान ॥८॥ हें जया सदैवा घडे भाग्ययोगें । मग तया न लगे साधन कांहीं ॥९॥ सकळ इंद्रियांचा करोनि निग्रहो । दंडावा विग्रहो वासनेचा ॥१०॥ हें तिजें निर्मळ घडे जया स्नान । न लगे अनुष्ठान करणें त्यासी ॥११॥ सर्वांभूतीं करुणा हेंचि पैं चवथें स्नान । साधितो सज्जन विरळा कोणी ॥१२॥ त्याचेनि दर्शनें जळती पापराशी । तो सर्वा तीर्थांसी तीर्थरुप ॥१३॥ पांचवें स्नान काया प्रक्षाळावी जळीं । करणें ते आंघोळी लौकिकाची ॥१४॥ काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । हे दोष दुर्धर देहामाजीं ॥१५॥ विवेक वैराग्य धरावें मानसीं । रहावें संगतीसी संतांचिया ॥१६॥ अनंत जन्माचें हेंचि प्रायश्चित्त । ज्याचे वाचे नित्य रामकृष्ण ॥१७॥ शांति क्षमा दया निजबोध निवृत्ती । अखंड खेळती जयापाशीम ॥१८॥ तो एक संसारीं धन्य शिंपी नामा । आवडता आम्हां जीवाहोनी ॥१९॥