भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज जाणावया जाय देवा

tuj janavaya jay deva

तुज जाणावया जाय देवा । तंव आठवे इंद्रियांचा हेवा । मनें करुनियां ठेवा । स्थान एक निर्मिलें ॥१॥ मग इंद्रियें भजती मना । अल्प जाली पै वासना । स्वरुप देखावया मना । मन नयन एकरुपें ॥२॥ तुझें ध्यान आवडे कान्हा । रुप न्याहाळी नयना । निजीं निरंतर वासना । कृष्ण ध्यानीं तत्पर ॥३॥ ऐसें तुझें रुप चोखडें । मनें निवडिलें पै कोडें । जें योगियां नसंपडे । ध्यानरुपीं रया ॥४॥ या रुपाचा सोहळा देई । हेंचि मागतुसे पाही । आणिक न मागे गा कांहीं । तुजवांचोनि स्वामिया ॥५॥ जरी स्वार्थ करुं कल्पनेचा । हरि हाचि विस्तारु प्रपंचाचा । काय यासि वर्णु वाचा । तूं दीनाचा स्वामी होसी ॥६॥ नको हा संसार व्यर्थ । भक्ति ज्ञान वैराग्य परमार्थ । हाचि देई मानीं स्वार्थ । नलगे अर्थ मायेचा ॥७॥ माझ्या मनें ध्यान केलें । रुपीं रुप हिरोनि घेतलें । थितें मीपणहि नेलें । मज आपुलें म्हणवें ॥८॥ गोंवी ज्ञान पदविये । ज्ञानाग्नि दावी मांडवीये । दृश्य द्रष्टा सर्वज्ञ सोये । अवघा होये दातारा ॥९॥ विश्व हें तूंचि क्षरलासि । आत्मा जगदाकारें होसी । सवेंचि क्षरलें मोडिसी । तदां शेखी एकत्त्व ॥१०॥ बापरखुमादेवीवरध्यान । वृत्तिसी साधलें पूर्ण । ज्ञानदेव म्हणे निधान । विठ्ठलीं मन स्थिरावलें ॥११॥