भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा । आले निजधामा देवरावो

tirthayatreprati bolavila nama | ale nijadhama devaravo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा । आले निजधामा देवरावो ॥१॥ चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली । श्रीमुख न्हाहाळी भरोनी दृष्टी ॥२॥ तैं निडारले नयन स्वेदें भिजलें वदन । ह्रदय जालें पूर्ण करुणारसेम ॥३॥ बाप कृपेचा सागरु सुखाचा सुखतरु । आर्त लोभापरु दीनालागीं ॥४॥ चरणीं ठेवुनी माथा पुसे जगन्माता । आजी कां अवस्था विपरीत देखों ॥५॥ म्हणे वाटतें जडभारी नाम्याच्या वियोगें । दाटलें उद्धेगे चित्त माझें ॥६॥ कवण्या सुखें स्थिर न राहे माझें मन । कैं डोळां देखेन प्राण माझा ॥७॥ इष्टमित्र बंधु मायबाप सखा । हीं नामें मज देखा ठेविलीं तेणें ॥८॥ तो कैसा मजवीण राखिल आपुला प्राण । हे चिंता दारुण वाटे मज ॥९॥ तव ती महामाया म्हणे जी यादव राया । झणीं तुमच्या नामया दिठी लागे ॥१०॥ शोक मोह दुःख क्षणामाजीं जाळी । तें जीवन त्याजवळीं नाम तुमचें ॥११॥