भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता । कर्ता करविता कोण याचा

tanv te jaganmata mhane ji krupavanta | karta karavita kon yacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता । कर्ता करविता कोण याचा ॥१॥ हा तुमचा दास आहे अंतरंग । काय या उद्वेग करणें असे ॥२॥ सर्व भार याचा लागे चालवणें । ऋणवई केलें येणें जन्मोजन्मीं ॥३॥ तुम्हांपरतें यासी जिवलग सोयरे । कोण आहेत दुसरे लोभापर ॥४॥ दृढ चरण धरोनि राहिला अंतरीं । जालासे अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥ जन्मोनिया येणें जोडिलें जें कांहीं । तितुकें तुमच्या पायीं निक्षेपिलें ॥६॥ म्हणोनि याचें कोड करावें परिपूर्ण । व्हावें पैं उत्तीर्ण ऋणियाचें ॥७॥ मायबापें याची सखी जिवलग । सांडोनि तुमचा संग धरिला सुखें ॥८॥ म्हणोनि याचें हित लागे विचारावें । उचित करावें देवराया ॥९॥ आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा । करणें हे गोपाळा ब्रीद तुमचें ॥१०॥ रुक्माई म्हणे हा भाग्यवंत नामा । न कळे याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥