भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव ते भाग्याचे सागर विनविती द्विजवर । म्हणती तूं माहेर जोडलासी

tanv te bhagyache sagar vinaviti dvijavar | mhanati tun maher jodalasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव ते भाग्याचे सागर विनविती द्विजवर । म्हणती तूं माहेर जोडलासी ॥१॥ चरणींचा वियोग न व्हावा सर्वथा । तोडावी ममता प्रपंचाची ॥२॥ नलगे मोक्षमुक्ति नलगे धनसंपत्ती । देई सत्संगती जन्मोजन्मीं ॥३॥ वेदशास्त्रपठणें वहिर्मुखवनें । केली अभिमानें छळणबुद्धी ॥४॥ धिक्‌ तें जाणपण धिक्‌ तो सन्मान । नाहीं प्रेमखूण कळली तुझी ॥५॥ कुळाचेनि अभिमानें अंतरलों गा तेणें । पूर्ण देहाभिमानें भुलोनियां ॥६॥ हें सकळ तुझी माया भुललों पंढरिराया । म्हणोनि जन्म वायां गेलें होतें ॥७॥ अपराधांच्या कोडी घडल्या पैं आमुतें । निषेधिलें तूतें मायबापा ॥८॥ परी त्वा दीनानाथें ब्रीद सत्य केलें । आम्हां तारियेलें पतितांसी ॥९॥ नकळे काय होतें संचित आमुचें । अनंत जन्माचें पूर्वपुण्य ॥१०॥ तें आजि फळलें तुझिया कृपादृष्टी । भाग्यें जाली भेटी संतजनां ॥११॥ दुर्जय तोडिले माया मोहपाश । केला पैं सौरस आपुल्या रुपीं ॥१२॥ तापत्रय वणवा विझविला अवचिता । दिलें प्रेमामृता जीवन आम्हां ॥१३॥ आतां सर्वकाळ अविट हे दृष्टी । यासाठीं संतभेटी निरंतर ॥१४॥ प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी । मग होत कल्पकोडी गर्भवास ॥१५॥ करता करविता तूंचि पैं एक । ब्रह्मांडनायक सर्वगत ॥१६॥ आमुचे अवगुण न धरावे मानसीं । निरवावें संतांसी माझे म्हणुनी ॥१७॥ तुझिया दासाचें द्यावें पैं दास्यत्व । तयाची वंदावी चरनधुळी ॥१८॥ हेंचि व्रततीर्थ क्रियाकर्म आम्हां । द्यावा नित्य प्रेमा नामयासी ॥१९॥