भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव नावेक श्रीहरी । तटस्थ घटिका चार्‍ही

tanv navek shrihari | tatastha ghatika char‍hi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव नावेक श्रीहरी । तटस्थ घटिका चार्‍ही । ध्यान धरुनी अंतरीं । निश्चळ राहिला ॥१॥ जयजयशब्द नामा बोभाये । केशवा त्राहे त्राहे । मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥२॥ नारायण त्राहे त्राहे । कृपादृष्टी तूं रे पाहे । मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥३॥ तुझेनि दर्शनें । ज्ञानाचेनि अवलोकनें । मज पंढरीस असणें । तुझे चरणी गा विठठला ॥४॥ आतां मज तूं सांभाळी । ज्ञानदेवेंवीण सदाकाळीं । मज न कंठे भूमंडळी । भानुसहित वर्ततां ॥५॥ तूं माझी जनक जननी । परि ज्ञानदेवेंविण मेदिनी । शून्य वाटे हे धरणी । जैसे मत्स्य जीवनेंविण ॥६॥ तूं रक्षिता सर्व जीवांसी । तरी कां दुःख दिधलें आम्हांसी । तूं जवळी असतां ह्रषिकेशी । ऐसी दशा हे प्राप्त ॥७॥ नामा खेदें क्षीण जाला जीवें । तंव नेत्र उघडिले देवें । आलिंगला केशवें । चार्‍ही भुजा पसरुनी ॥८॥