भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा

suvarna ani parimal | hira ani komal | yogi ani nirmal | hen durlabh ji datara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥ देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥ धनवंत आणि दयाळु । व्याघ्र आणि कृपाळु । अग्नि आणि सीतळु । हें दुर्लभ जी दातारा ॥३॥ सुंदर आणि पतिव्रता । साव-धान होय श्रोता । पुराणिक तरी ज्ञाता । हें दुर्लभ जी दातारा ॥४॥ क्षत्रिय आणि शूर भला । चंदन फुलीं फुलला । स्वरूपीं गुण व्यापिला । हे दुर्लभ जी दातारा ॥५॥ ऐसा संपूर्ण सर्व गुणीं । केवी पाविजे शारंगपाणी । विष्णुदास नामा करी विनवणी । मुक्ति चरणीं त्याचिया ॥६॥