भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख तें आपुलें चोरांशी वांटिलें । पालटें घेतलें दुःख त्यांचें

sukh ten apulen choranshi vantilen | palaten ghetalen duhkh tyanchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुख तें आपुलें चोरांशी वांटिलें । पालटें घेतलें दुःख त्यांचें ॥१॥ नित्य नवी त्याची सोसितां सोसिणा । नयेचि तुज अझोनी वीट मना ॥२॥ ऐसा तूं निर्लज्ज पाहे आत्मघातीं । कैसी तुझी खंती न वाटे तुज ॥३॥ लक्ष या चोर्‍यांशीं सोसितां यातना । भोगिसी पतना ज्यांच्या संगें ॥४॥ त्यांते भजसी सांग पुढती कोण्या मोहें । विचारुनि पाहे तुझा तूंचि ॥५॥ सदा चिंतातुर होऊनि दीनरुप । संकल्प विकल्प करिसी किती ॥६॥ नाथिलाची छंदु नाहींत्या दुराशा । भोंवसी दाही दिशा तळमळीत ॥७॥ त्यांची इंद्रियें बापुडीं असती केविलवाणीं । विषयी लागोनी लोलंगिती ॥८॥ तूं हे आशा करिसी निरंतरीं । जालासी भिकारी कृपणाचा ॥९॥ आलें काळभय हाकीत टाकीत । मूढा तुझें हित कोण करी ॥१०॥ त्रिभुवनीं समर्थ बळी जगजेठी । रिघें त्याचे पाठीं म्हणे नामा ॥११॥