भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदर्शन धरिलें शिरीं । क्षेत्राभोंवतें फिरे वरी । जगदात्मा राज्य करी । पांडुरंग तेथींचे

sudarshan dharilen shirin | kshetrabhonvaten phire vari | jagadatma rajya kari | pandurang tethinche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुदर्शन धरिलें शिरीं । क्षेत्राभोंवतें फिरे वरी । जगदात्मा राज्य करी । पांडुरंग तेथींचे ॥१॥ शिव सांगे स्कंदाप्रती । पंचक्रोशीमाजीं वस्ती । कृमी कीटकादि जीवयाती । ते ते होती चतुर्भज ॥२॥ नरनारी तेथींचे जन । हरि सन्निध हरिची समान । नित्य करिती अवलोकन । प्रत्यक्ष रुप विष्णूचें ॥३॥ भूमंडळींचीं सकळ तीर्थे । होतीं चंद्रभागेसी सुस्नातें । माध्यान्हकाळीं येऊनि तेथें । करितीं मार्जनें नित्यानि ॥४॥ पुंडलिक मुनीश्वर । घेऊनी पूजेचें संभार । माता पिता आणि हरिहर । पूजी विठोबारायातें ॥५॥ जे जे प्राणी यात्रेसि येती । ते ते वैकुंठीचि वसती । प्रत्यक्ष श्रीहरीतें भेटती । पुन्हां न येती संसारा ॥६॥ सकळ देवांचे देवतार्चन । मुनिजनांचे ध्येय जे ध्यान । संत सनकादिकांचें जीवन । उभें असें विटेवरी ॥७॥ नाम स्मरतांचि पावन करी । दर्शनानेंचि पतीतासी उध्दरी । युगें गेलीं परी हा दुरी । नवजेचि भक्तापासुनि ॥८॥ देव भक्ततीर्थक्षेत्र । चारी सन्निध ऐसे विचित्र । पाहती याचे धन्य नेत्र । स्वयें पंचनवत्क्त्र अनुवादला ॥९॥ अगाध क्षेत्र हें पंढरपुर । सकळिक संतांचें माहेर । घर सोळा सहस्त्र अंत:पूर । सहित रुक्मिणी रहिवासली ॥१०॥ निळा म्हणे यात्रेसी येती । पुण्या त्यांचिया नाही मिती । पाउलां पाउलीं यज्ञाचि घडती । प्रत्यक्ष्‍ा भेटती परब्रम्हा ॥११॥