भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपान समाधी बैसला । सकळीं पुष्पवर्षाव केला

sopan samadhi baisala | sakalin pushpavarshav kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोपान समाधी बैसला । सकळीं पुष्पवर्षाव केला । जयजयकारें भूगोल कोंदला । आनंद दाटला महीवरी ॥१॥ धन्य धन्य हा सोपान । वर्णितसे श्रीभगवान । क्षणोक्षणीं माझी आठवण । उद्विग्न मन होतसे ॥२॥ नारद तुंबर अक्रूर उद्धव । पुंडलिकादि करूनि सर्व । मुनिदेवगण गंधर्व । स्तुतिस्तव बोलती ॥३॥ म्हणती चौघेजण भाग्याचे । जें निदान ब्रह्मादिकांचें । तें निजध्यान शंकराचें । सकळ जीवांची जीवनकळा ॥४॥ तो प्रत्यक्ष येऊनि अनंत । याची परिचर्या करित । भक्ता साह्य होऊनि भगवंत । पूर्ण आर्त करावया ॥५॥ निजभक्तांचें कौतुक । करोनि ब्रह्मांडनायक । तया वर्णिती सनकादिक । वरकड मशक बापुडें ॥६॥ पुंडलिक विस्मयें बोलती । हे चौघे भाग्याच्या मूर्ती । यांच्या नामें जग उद्धरती । पावे विश्रांति जगासी ॥७॥ नामा म्हणे सकळ जगाचा । उदय जाहलासे दैवाचा ॥ सुकाळ केला स्वानंदाचा । ब्रह्मविद्येचा मृत्युलोकीं ॥८॥