भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरु देवराया प्रणिजातु जो माझा

shriguru devaraya pranijatu jo majha

श्रीगुरु देवराया प्रणिजातु जो माझा । मनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा । समाधि घेइ पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी पौढलिया नाशिवंतरे माया ॥१॥ जागरे पुत्रराया जाई श्रीगुरुशरण । देह तूं व्यापिलासि चुकवी जन्ममरण । गर्भवासु वोखटारे तेथें दु:ख दारुण । सावध होईकारे गुरुपुत्र तूं सुजाण ॥२॥ मदलसा म्हणे पुत्रा ऐक बोलणें माझें । चौर्‍यांशी घरामाजी मन व्याकुळ तुझें । बहुत सिणतोसी पाहातां या विषयासी । जाण हें स्वप्नरुप येथें नाहीं बा दुजें ॥३॥ सांडिरे सांडि बाळा सांडि संसारछंदु । माशिया मोहळरे रचियेलारे कंदु । झाडूनि आणिकी नेला तया फ़ुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशे आनंदु ॥४॥ सत्त्व हें रज तम लाविती चाळा । काम क्रोध मद मत्सर तुज गोंविती खेळा । यासवें झणें जासी सुकुमारारे बाळा । अपभ्रंशी घालतील मुकसिल सर्वस्वाला ॥५॥ कोसलियानें घर सुदृढ पैं केलें । निर्गुण न विचारितां तेणें सुख मानियेलें । जालेरे तुज तैसें यातायाति भोगविले । मोक्षद्वारा चुकलासि दृढ कर्म जोडलें ॥६॥ सर्पे पै दर्दुर धरियेलारे मुखी । तेणेंहिरे माशी धरियेली पक्षी । तैसा नव्हे ज्ञानयोगु आपाआपणातें भक्षी । इंद्रियां घाली पाणी संसारी होईरे सुखी ॥७॥ पक्षिया पक्षिणीरे निरंजनीं ये वनीं । पिलिया कारणेंरे गेली चारया दोन्ही । मोहोजाळे गुंतलीरे प्राण दिधले टाकुनी । संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥ जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला । तैसा नव्हें ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला । अनुभवीं गुरुपुत्र तोचि स्वयं बुझाला । ऐके त्या उध्दरणा गायक सहज उध्दरला ॥९॥