भजनी मालिका
← भजनांकडे परत

शहाणियाची दासी होईन कामारी

shahaniyachi dasi hoin kamari

शहाणियाची दासी होईन कामारी । तो अनुसरु तेथें नव्हेरी ॥ चित्तासारिखा मिळो गोंवळु रानींचा । तो मज मेरु कनकाचांगे बाईये ॥१॥ लक्ष असो त्या मूर्खाचे गोठीं । परि तो नाणावा माझिये दृष्टी ॥ कर्पूराची राशी कुल्लाळ नासी । कवण साहित्याची तुटी गे माये ॥२॥ अविंधे मोतिये तेजें सुढाळें । सोहरुं जाणे ते शहाणे ॥ टाकियाच्या घायीं पाषाण विंधती । तैसें त्या मूर्खाचें जिणेंगे बाईये ॥३॥ चंदनाच्या दुतीं वेधल्या वनीच्या वनस्पती । परि तो वेळु न वेधें चित्तीं ॥ उदकामाजीं तैसी पाषाणाची वस्ती । तैसी त्या मूर्खाचि संगतीगे बाईये ॥३॥ भ्रमरु काळा भोगी पुष्ययाती सकळा । तेथें म्हैसा येवो नेदावा जवळा ॥ परिसु पाषाणाचा परि तो गुणें आगळा । तैसा वैष्णव मिळो मज दुबळागे माये ॥४॥ ऐशा सकळ कळा भोगिसी । नंदरायाचा गोंवळु म्हणविसी ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला तुज न विसंबे अहिर्निशी रया ॥५॥