भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वजीव तूं जालासी आपण तरी

sarvajiv tun jalasi apan tari

सर्वजीव तूं जालासी आपण तरी निरय आपदा भोगिताहे कवण । परमात्मया तुमचें अविनाश स्वरुप तरी येवढें कां कष्ट साधन । तूं अंतरीं परब्रह्म सांवळें म्हणोनि जगत्रय व्यापिलें या ध्यानें । म्हणोनी तुमचा पुत्र जालों स्वामिया जगाअधीन कां केलें माझें जिणें रया ॥१॥ तूं बाप म्हणतां मी लाजिलों माघारा ठेलों । एकीकडे काळ एकीकडे संसार मध्येंची वाटे ठेलों । ऐसिया संनिधी तुज जवळा येवों पाहें तंव तुझीया देवपणा भ्यालों ॥२॥ नांदबिंदापासाव शरीर जन्मलें असाध्य करुनी वरी साक्ष देऊनी मदामांसामाजी वाढविलें । कर्मदेह वेचुनी सत्य सुकृतालागी उपजविलें । तरी हें दैन्य दारिद्र कां भोगविलें । तुझीया बापपणा बोलु लागला तरी मज पुत्रसें वायां म्हणितलें रया ॥३॥ आयुष्याची गणना करुनिया प्रमाण वरी मनुष्यदेह ऐसें नाम ठेविलें । तें आयुष्य कां स्वामी तुम्हीं दोंठायी वाटिलें । अर्ध रात्रीचे अर्ध दिवसाचे निरय सत्त्व वेचिलें । पैल समर्थाचे बाळक रंके गांजिलें । त्याचें थोरपण तें काय जालें रया ॥४॥ बांधोनी जन्म आम्हांकडे भोगविसी आपणया मायबाप म्हणविसी । विश्व प्रसवला या जागासी तरी आधारु आहे ऐसे अनुवादसी । जगत्रजीव तव शिव हे तो नये माझिया मनासी । पैल कीटकिये भृंगिये तैसी जाले तैसें कां न करिसी आह्मासीरे ॥५॥ अल्प दोषासाठीं आह्मांतें दंडिसी येवढें कैचे मंत्रसाधन जे भक्ति करुनि निरसूं तयासी । तुज देखतां काळ शरीर फाडफाडुं भक्षिताहे कवण कां सांडिली ऐसी । जठर सीणसीण फुटतील देवा वायां कष्टविसिल आम्हांसिरे ॥६॥ दर्पणीं पाहातां येकचि दिसे तेथें अनुसारिखें कांहीं न दिसे । रविबिंब उगवलिया किरणीं प्रकाश आस्तु जालियावरी कांहीं न दिसे तैसे गुरुशिष्य संवाद सोहं बोध ऐक्य जालें अभ्यासें । याहूनि जाणसी तें करि वेळोवेळां आतां सांगो मी तें कैसें रया ॥७॥ यमें जाचितां कांहीं नुरे यालागीं मुनि सेविती वनवास । खवणीक फणीक लुंचनीक वसैत भटभराडे धाकें करिती आरामसंन्यास । योग साधावया वनवास सेविती करिती पवनअभ्यास । इंद्रियें दंडून परतोनि गृहस्थान न पवतीच खडु पान रसु रया ॥८॥ जळींचा तरंगु जळीं निमाला तो अनुठाया वेगळा नाहीं गेला । तैसा तुजमाजी दातारा मध्यें कां हा प्रपंच वाढविला । तूं देव आम्हीं प्राकृत मनुष्यें हा आगमु कां गमला । मज पाहतां हें अवघेंचि लटिकें जैसें असेल तैसें सांग पां उगला ॥९॥ लवण पाणीयांसी कीं पाणी लवणासीं ऐक्य जालियाविण निवडेना गुणास । लोहो लागलें परिसीं तें उठिलें कनकेंसी बापरखुमादेविवरा विठठला परियेसी । आजिपासून ये तरी तुझीच आण पुढती न घाली न निघे गर्भवासीं रया ॥१०॥