भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार वो ग्रामीं गेला सांडुनी

sansar vo gramin gela sanduni

संसार वो ग्रामीं गेला सांडुनी । माझे अंत:करणीं माहियेर ॥१॥ सासुरवासिनी मी वो परदेशिनी । कां नये अझुनी मूळ मज ॥२॥ आणिक एक अवधारा । मज दिधलें हीनवरा । माझें कांहीं सर्वेश्वरा न विचारिशी ॥३॥ व्याली वेदना जाणे वांझ कांही नेणें । बालक काय जाणे तहान भूक ॥४॥ तैसी ते नव्हे लेकुराची माये । कृष्ण माझी धाये मोकलिते ॥५॥ आशा मनशा तृष्णा कल्पना चौघी नणंदा । पापीण रे चिंता सासू माझी ॥६॥ सासुरा हा स्वार्थ कांही न विचारी परमार्थ । आतां करीन घात तयावरी ॥७॥ दुरळ हा प्रपंच दुष्ट भावे आणि दीर । इहीं मज थोर कष्टविले ॥८॥ काम क्रोध थोर बोलती बडिवार । मज म्हणती पोर निर्देवाचे ॥९॥ नैश्वर गहिवरु दाटतसे गळा । आसुवें ढळढळा गळताती ॥१०॥ सासुरयाचे घरीं करित होते काम । अवचित विंदान मांडियेलें ॥११॥ घरा सोळा सांधी बहात्तर कोठे । नवही दारवंटे झाडीत होते ॥१२॥ चोळी व साउले हिरोनि घेतलें । उघडे पाठविलें माहेराशी ॥१३॥ समर्थाची लेकी परि मी संताची पोसणी । विमानीं बैसोनि जाते देखा ॥१४॥ बाप चक्रधरा रुक्मादेवीवरा । उबगला संसारा येऊं नेदी ॥१५॥