भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्रणियां भोगिल्याविण । यालागीं करावें हरीचें स्मरण । तुटेल बंधन मग त्यांचे

sanchit prarabdha kriyaman | na sute praniyan bhogilyavin | yalagin karaven harichen smaran | tutel bandhan mag tyanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्रणियां भोगिल्याविण । यालागीं करावें हरीचें स्मरण । तुटेल बंधन मग त्यांचे ॥१॥ सतकर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंग होत । होय तें संचित निश्चयेंसी ॥२॥ उत्तम अधम कर्मे घडती । जाणतां नेणतां पदरीं पडती । तीं‍चि संचिते होऊनि ठाती । पुढें भोग दयावया ॥३॥ पापपुण्यात्मक कर्मे घडलीं । भोगितां उर्वरीत जीं राहिलीं । फळ दयावया उभीं ठाकलीं । प्रारब्धें लाभालाभदायके ॥४॥ क्रियमाणें जें आतां आचरे । सत्कमें अथवा अकर्माकारें । जें जें निपजे नित्य व्यवहारें । क्रियमाण ऐसें बोलिजे तें ॥५॥ आतां तिहींचेही निस्तरण । घडे जेणें ते ऐक खूण । संचितें घडे जन्ममरण । उत्तम अधम योनिव्दारें ॥६॥ जे जे योनी धरी जो जन्म । तेथींचे विहित त्याचि त्या स्वधर्म । सांग नव्हतां भोगणें कर्म । नव्हेचि सुटिका कल्पांतीं ॥७॥ आतां भलतेही योनीं जन्म होतां । अनुतापें भजे जो भगवंता । नामें त्याचीं गातां वानितां । दहन संचिता भक्तियोगें ॥८॥ यावरी प्रारब्धें भोग येती अंगा । भोगितां स्मरे जो पांडुरंगा । निस्तरे प्रालब्धां तो वेगा । पावे अंतरंगा श्रीहरीतें ॥९॥ जें जें नित्यांनी आचरत । तें ब्रम्हार्पण जो करित । अहंकृति न धरी फळ कामरहित । क्रियमाण जाळीत निष्कामता ॥१०॥ याचिलागीं निळा म्हणे । कर्मपाश तुटती येणें । विठोबाचिया नामस्मरणें । यातायाती चुकती ॥११॥