भजनी मालिका
← भजनांकडे परत

सनकादिकीं मंत्रघोष । केले विधिपूर्वक पांच दिवस

sanakadikin mantraghosh | kele vidhipurvak panch divas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सनकादिकीं मंत्रघोष । केले विधिपूर्वक पांच दिवस । मग पांडुरंग यथावकाश । भक्ता वास महिवरी ॥१॥ धन्यभूमि आळंकापुरी । ज्ञान समाधि खेचरी । पूर्ण परिपूण श्रीहरी । स्वयें आपण उभा असे ॥२॥धृ०॥ संत भागवत देव्हडे । अमर उभे चहुंकडे । नारद तुंबर पुढें । वीणा वाजविती ॥३॥ एकीं केला जयजयकार । ज्ञानदेवीं धरुनियां कर । विठठल चरणा समोर । निकट बैसते जाले ॥४॥ करें कुरवाळिलें ज्ञाना । कांसवी अवलोकिला पान्हा । आंसुवें येताती नयना । तया ज्ञानदेवाचिया ॥५॥ विठोजी म्हणे ज्ञानांजना । तुझेनि कवित्वें हर दारुणा । उच्चारितां महाविघ्ना । सकळै पळतील ॥६॥ तुज आठविले जो भक्त । तो होईल विरक्त । ऐसें विठोजी बोलत । येरु चरणीं रुळे ॥७॥ नामा म्हणे सकळ तीर्थराज । तया कृपा कैसी केली सहजा । एकादशीं दिधली पूजा । तया ज्ञानदेवासी ॥८॥