भजनी मालिका
← भजनांकडे परत

सभा समस्त साधु संतांची

sabha samasta sadhu santanchi

सभा समस्त साधु संतांची । महामुनी विरक्ताची । पंडितपाठकज्ञानियांची । समस्तासी विनवणी ॥१॥ या पहिलिया पाहार्‍यांत । डौरकार सांगेल मात । समस्त रिझाल तुम्हीं संत । ऐका निवांत तुम्ही सर्व ॥२॥ आतां परिसा पांच नाच । पांच नादाचे पांच भेद । पहिला नाद चटपट चटपट । दुसरा नाद खटपट खटपट । पांचवा तळमळ तळमळ ॥३॥ पहिला नाद चटपट चटपट । शिखासूत्र त्यजुनी सपाट । विरजा होमिला दृष्ट । परि अपुट तैसाची ॥४॥ वाया केली तडातोडी । वृथा त्यजिली सूत्रूशेंडी । परि विषय वासना न सोडी । उपाधि गाढी श्रीपादा ॥५॥ संन्यास घेऊनी कांचा । जिव्हांशिश्न वेधलें लांचा । विटंबु केला बापुडे कायेचा । चटपट मनींचें मनीं वसे गा दादेनो ॥६॥ खटपट खटपट । शास्त्रप्रज्ञा अलोट । बांधोनी व्युत्पत्तीची मोट । सैरा सुनाट धांवती ॥७॥ वादतर्का लागी धावे । भरला विषयाचे नांवे । वरिवरि वृंदावन दिसे बरवें । परी अंतरीं कडुवट गा दादेनो ॥८॥ लटपट लटपट । मेळवूनि शिष्यांचा थाट । अद्वैत ज्ञानाचा बोभाट । भरला हाट जिविकेसी ॥९॥ गुरु लोभी धनमानें । शिष्य लोभी अति दीन । दोघांसी लटपट लागली पुर्ण । कोणी कोणासी आवरेना ॥१०॥ ब्रह्मज्ञान जाहलें वोस । पाहिले दु:खाचे दिवस । अंतीं जाले कासावीस । कामपाश समंध गा दादेनो ॥११॥ आतां फटफट फटफट । या नादाची गोठ नीट । वोळागोनी ओटपीठ । उर्ध्व पाठ भेदिती ॥१२॥ मन पवन समरसोनी ॥ ब्रह्मरंध्रीं लीन होउनी ॥ हा अभिमान वाहोनी । जालेपणी फूंजती ॥१३॥ तें वोखटें गा डौरकारा । करोनि देहाचा मातेरा । भरुं पाहाती सुषुम्ना द्वारा । परि असाध्य खरा तो मार्गु ॥१४॥ ऐसी जालिया ब्रह्मप्राप्ती । शिणतोच अहोरात्रीं । अति विरोध भगवद्वक्ति । यालागीं बोलती फटफट हा दादेनो ॥१५॥ आतां तळमळ तळमळ । धरणीं पारणी हळहळ । तीर्थयात्रे लागीं चळपळ । घेतलें बळ तपाचें ॥१६॥ जपध्यान मंत्रावळी । नाना दैवतें आराधिलीं । शेखीं काळें नरडी चेंपिलि । दु:खें तळमळी या हेतु ॥१७॥ ऐसे भेद नादाचे । मनीं धरा विवेकाचे । ज्ञानदेव बोले निवृत्तिचें । बोला वाचें हरिनाम गा दादेनो ॥१८॥