भजनी मालिका
← भजनांकडे परत

रांजण गांवामध्यें संताजी पवार । असे तो सरदार नामांकित

ranjan ganvamadhyen santaji pavar | ase to saradar namankit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रांजण गांवामध्यें संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥ स्वामी काजामध्यें असे तो सावध । भावें हा गोविंद आठवीत ॥२॥ शास्त्र भागवत करितां श्रवण । समजलें पूर्ण मनामाजी ॥३॥ नाशवंत सर्व आहे हा संसार । नाम एक सार विठोबाचें ॥४॥ ऐसें कांहीं आतां करावें साधन । रामनामीं मन लागेल तें ॥५॥ कासियासि आतां हा पाहिजे उद्योग । घेतलें वैराग्य तेचि वेळां ॥६॥ मातेलागीं तेव्हां केला नमस्कार । निघाले हे त्वरें तेथूनियां ॥७॥ बाबा संतराजा कां बा केला त्याग । घेतलें वैराग्य कासयास ॥८॥ काय जड भारी पडियेलें तुज । सांग कैसें गुज मजलागीं ॥९॥ नको नको माते या संसाराची बेडी । फारच आहे गोडी हरिनामांत ॥१०॥ नामामृत पान करीन हें आतां । माधान चित्ता होय माझ्या ॥११॥ करूं दे सार्थक आलिया देहास । नको भव फांस घालूं आतां ॥१२॥ वारंवार तुज हेचि विज्ञापना । पाहूं दे चरणा देवाजीच्या ॥१३॥ कृपा करूनियां देईं आशिर्वाद । सखा हा गोविंद करीं माझा ॥१४॥ करुनी प्रार्थना निघाले तेथुनी । चालिले ते वनीं अरण्यांत ॥१५॥ नको नको मज भव हा संसार ॥ उतरावें स्वामीसंगें मजलागीं ॥१७॥ गंगेचा हा ओघ सागरासी गेला । नाहीं परतला मागुता तो ॥१८॥ ऐसे महाराज तुम्ही कृपावंत । समाधान चित्त करा माझें ॥१९॥ येईन सांगातें करीन हे सेवा । मान्य हे केशवालागीं असे ॥२०॥ पहा महाराजा तुम्ही कृपाद्दष्टी । कां मज हिंपुटी करीतसां ॥२१॥ जळा तो वेगळा कैसा राहे मीन । जाईल हा प्राण तेचि वेळां ॥२२॥ तुमचे चरणीं बहु आहे सुख । नको भवदु:ख संसार हा ॥२३॥ सार रामनाम फार आहे गोड । पुरवा आवड माझी आतां ॥२४॥ आवडीचें लेणें द्यावें मज आतां । तुम्ही प्राणनाथा कृपासिंधु ॥२५॥ रामनास अंगीं लेववा भूषण । तेणें समाधान होय माझें ॥२६॥ दीपक ही प्रभा नव्हेचि वेगळी । पाहूं वनमाळी संगें दोघें ॥२७॥ तेव्हां संतराज करिती उत्तर । न धरवे धीर तुजलागीं ॥२८॥ न सोसवे तुज कठीण बैराग्य । नको येऊं मागें माझ्या आतां ॥२९॥ सांडोनियां द्यावी देहाची हे आस । तेव्हां तुटेल फांस संसाराचा ॥३०॥ कामक्रोध यांसी देऊं नये थार । लीन व्हावें फार संतांपायीं ॥३१॥ वस्त्रें भूषणाची धरुं नये चाड । ध्यावें नाम गोड गोविंदाचें ॥३२॥ लौकिकाची कांहीं धरूं नये लाज । बोलावें हें गुज देवाजीसीं ॥३३॥ द्वतै कल्पनेचा नसे जेथें ठाव । तोचि झाला देव स्वयें अंगें ॥३४॥ ऐकोनियां ऐसें बोले कांता त्यासी । आनंद मानसीं हाचि माझ्या ॥३५॥ तिचि वेळां केला भूषणाचा त्याग । घेतलें वैराग्य पतिसंगें ॥३६॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं ॥ राहती ते वनीं आनंदानें ॥३७॥ तेव्हां संत राज बोले कांतेलागीं । भिक्षेलागीं वेगीं जावें आतां ॥३८॥ पारगांव असे भीमे पलीकडे । कोणासी सांकडें न घालावें ॥३९॥ संतोषानें जे कां देतील पदरीं । म्हणावें श्रीहरी अर्पण तें ॥४०॥ आनंदानें तेव्हां निघाली तेथुनी । वाचे नारायण गात असे ॥४१॥ भिक्षा मागतांना नणंद भेटली । तिणें ओळखिली भाउजई ॥४२॥ कासयासी बाई घेतलें वैराग्य । कांगे केला त्यग संसाराचा ॥४३॥ सांडोनियां सर्व हें राज्य संपत्ती । उदास कां चित्तीं झालां तुम्ही ॥४४॥ ऐकोनियां येरी करीत उत्तर । सांपडलें सार संसारींचें ॥४५॥ सार नामामृत गोड आहे फार । प्राशन चतुर करिताती ॥४६॥ सद्रुरु कृपेचा वर्षाव जाहला । प्रसाद लाधला भ्रतारासी ॥४७॥ त्यांतील हें शेष त्या पात्रीं राहिले । आवडी सेविलें माझ्या एक्या मुखें ॥४९॥ अखंड सेविती नित्य साधुसंत । भाग्या नाहीं अंत त्याचीया तो ॥५०॥ येरी म्हणे वाई करावें भोजन । भिक्षा जा घेऊन येथूनियां ॥५१॥ आग्रह करून दोन पोळ्या आतां । घातल्या झोळींत न कळतां ॥५२॥ आज्ञा घेऊनियां निघाली ते त्वरें । पोंहचली तीरा भीवरेचे ॥५३॥ भीवरे उगमीं पर्जन्य पडीला । पुर तेथें आला अकस्मात्‌ ॥५४॥ पलीकडे जावया न दिसे उतार । झाली चिंतातुर मनामाजी ॥५५॥ स्वामी माझा तेथें असे उपवासी । काय हृषिकेशी करूं आतां ॥५६॥ ऐकोनियां कोळी झाला नारायण । नेलें उतरून पार तीतें ॥५७॥ पतीलागीं तिनें केला नमस्कार । ठेविली समोर भिक्षा त्याचे ॥५८॥ येरु म्हणे कैसी आलीस तूं पार । कोळीयानें त्वरें उतरीली ॥५९॥ कैंचा कोळी तेथें आले पांडुरंग । धन्य तुझें भाग्य भेट झाली ॥६०॥ प्रेमअश्रु डोळां वाहे त्याचे नीर । भेट द्यावी त्वरें पांडुरंगा ॥६१॥ भेटी वांचूनियां न करीं भोजन । करीतसे ध्यान देवाजीचें ॥६२॥ वाणी एक होता रांजणगांवांत । झाला द्दष्टांत त्याजलागीं ॥६३॥ बोले पांडुरंग करुनि पव्कान्न । घालावें भोजन संतराजा ॥६४॥ करुनी पाकसिद्धि वाणी गेला तेथें । सांगे तो वृत्तांत त्याजलगीं ॥६५॥ येरु म्हणे तुज देवाजी भेटले । निष्ठुर कां झाले मजविसीं ॥६६॥ करीन भोजन देवा तुझ्या हातें । कांहो माझें चित्त पाहातसां ॥६७॥ पतीत मी पापी तुझा शरणागत । समाधान चित्त कर माझें ॥६८॥ न मागें मी कांहीं देवा तुज आतां । भेट तूं अनंता एक वेळां ॥६९॥ भाकितां करुणा आले नारायण । करीं बा भोजन संतराजा ॥७०॥ आलिंगूनि दोघां धरिलें ह्रदयीं । झाली विठाबाई कृपावंत ॥७१॥ काय इच्छा असे मागा तुम्ही आतां । नामीं हे अनंता प्रीत देईं ॥७२॥ भिक्षेचें पवित्र भक्षिताती अन्न । अहोरात्न ध्यान देवाजीचें ॥७३॥ आषाढीची यात्रा जात पंढरीसी । आनंद मानसीं जाहला त्यांचे ॥७४॥ भेटतील आतां माझे दिनानाथ । आणीकही संत साधुजन ॥७५॥ समारंभें जाती करीत गजर । पोहोंचले तीर भीवरचें ॥७६॥ व्रत एकादशी होती तेचि दिनीं । भीवरा भरोनि चाललीसे ॥७७॥ नामाचेंनि छंदें जाहला ब्रम्हानंद । चालिले आनंदें त्याची पंथें ॥७८॥ कूर्मरूप तेव्हां जाहला नारायण । नेलें उतरून पार त्यातें ॥७९॥ स्वर्गीं सुरव्र बैसोनि विमानीं । पाहती नयनीं कवतुक ॥८०॥ धन्य साधुसंत भाग्या नाहीं पार । वाहे पृष्ठीं भार देव त्यांचा ॥८१॥ भीमा उतरूनि आले पंढरिसी । आनंद मानसी सर्वत्रांचे ॥८२॥ अणीकही भार अयात्रेचा तो आला । त्याणें हा देखिला नवलावो ॥८३॥ म्हणती संतराजा नेईं आम्हां पार अ। भेटवीं हा वर रखुमाईचा ॥८४॥ कृपावंत साधु आले धांऊनियां । म्हणती पंढरिराया सांभाळावें ॥८५॥ भावाची ही पेठ बांधा बळकट । मार्ग धरा नीट भक्तीचा हा ॥८६॥ संतांचा हा संग धरावा सप्रेम । न वाधा हा श्रम तुम्हालागीं ॥८७॥ रामनाम संगें धरावें भांडवल । वस्तु हे अमोल येईल हाता ॥८८॥ सभाग्य हे साधु त्यांनीं केला सांठा । देतील ते वांटा तुम्हांलागीं ॥८९॥ नामाचें तें रूप असे सर्व सृष्टी । दाविती तो द्दष्टी ज्ञानाची हे ॥९०॥ तेव्हां तुझ्या मना होईल आनंद । तोचि ब्रह्मानंद ओळखावा ॥९१॥ द्वैत क्ल्पनेसीनसे जेथें ठाव । आला तोचि देव स्वयें अंगें ॥९२॥ सद्‌गुरु कृप्नें हरेल हा भ्रम । दिसेल हें ब्रम्हा जग सारें ॥९३॥ त्याजविण कोठें रिता नाहीं ठाव । धरा नामीं भाव विठोबाच्या ॥९४॥ उतरूनि भीमा गेले पैल तीरा । भेटावया वरा रखुमाईच्या ॥९५॥ ब्रम्हानंद झाला सर्वांचे अंतरीं । आनंदें श्रीहरि आठविती ॥९६॥ पंढरीच्या सुखा भाग्या नाहीं अंत । जाणताती संत साधुजन ॥९७॥ नित्यानित्य घडे चंद्रभागे स्नान । अखंड दरुशन देवाजीचें ॥९८॥ तयाचिया भाग्या अंत नाहीं पार । राहिला सार संतोबा तो ॥९९॥ नामदेव तेथें याचक भिकारी । हाका त्यासी मारी वारंवार ॥१००॥ कांहीं मज द्यावें तुमचें उच्छिष्ट । भरेल हें पोट तेणें माझें ॥१०१॥ कृपावंत साधु आली त्या करुणा । वंदितो चरणा नामदेव ॥१०२॥