भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेम अंगीं सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा

prem angin sada vache bhagavant | premal to bhakta kumbhar gora

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रेम अंगीं सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा ॥१॥ असे घराश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा ॥२॥ कालवुनी माती तुडवीत गोरा । आठवीत वरा रखूमाईच्या ॥३॥ प्रेम आंगीं से झांकुनी नयन । करीत भजन विठोबाचें ॥४॥ तयाचिये कांता आणूं गेली जळ । खेळतसे बाळ आंगणांत ॥५॥ रांगत लेंकरूं गेलें असे तेथें । तुडविलें त्यातें न कळतां ॥६॥ तत्क्षणीं त्याचा गेला तेव्हां प्राण । घेउनी जीवन आली कांता ॥७॥ पाहती तों चिखलांत दिसे रक्तमांस । केला तो आक्रोश मोठा तिनें ॥८॥ पिटीयेलें तेव्हां आपुलें वदन । जळो हें भजन तुझें आतां ॥९॥ डोळे असोनियां जाहलासी आंधळा । कोठोनी कपाळा पडलासी ॥१०॥ कसाबासी तरी कांहीं येती दया । कांरे बाळराया तुडविलें ॥११॥ विठोबानें कैसें लावियेलें वेड । नाहीं मागेंपुढें पाहिलेंसी ॥१२॥ निर्दयाची तुज लागली संगती । अधर्मीं श्रीपति देखियेला ॥१३॥ काय तुझा यानें केला असे अन्याय । दूर परता होय चांडाळा तूं ॥१४॥ होतीं लोटोनियां केला तो परता । आग लाव आतां विठोबासी ॥१५॥ ऐकूनियां शब्द सावध तो जाहला । कांगे भंग केला भजनाचा ॥१६॥ विठोबासी । माझ्या कांगे त्वां गांजिलें । कर्म ओढवलें बाळकाचें ॥१७॥ सांग मज ऐसें कोणाचें तें जालें । पुण्य फळा आलें लेंकुराचें ॥१८॥ याजसाठीं माझ्या गांजिलेंसे देवा । पाठी लागे तेव्हां मारावया ॥१९॥ हात बोट मज लावशील आतां । आण तुज सर्वथा विठोबाची ॥२०॥ ऐकतांचि ऐसें ठेवियेली काठी । राहिला उगाची गोरा तेव्हां ॥२१॥ न करी तो कांहीं तयेसीं भाषण । वर्जियेली तेणें कांता तेचि ॥२२॥ विनवीते कांता गोरिया लागुनी । न मोडीं मी आण विठोबाची ॥२३॥ जाली तेव्हां श्रमी वंश बुडविला । विठोबा कोपला मजवरी ॥२४॥ मनामाजी तेणें केला तो विचार । करावें दुसरें लग्न याचें ॥२५॥ बोलाविला तिनें आपुला तो पिता । सांगितली वार्तां त्याजलागीं ॥२६॥ कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा । नको या विचारा पाहूं आतां ॥२७॥ अवश्य म्हणूनियां विनविला गोरा । लग्नाची हे त्वरा केली तेव्हां ॥२८॥ लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा । दोघीसही पाळा समानची ॥२९॥ न पाळितां आण तुम्हा विठोबाची । धरा या शब्दाची आठवण ॥॥३०॥ अवश्य म्हणोनियां निघाला तो गोरा । आला असे घरा आपूलिया ॥३१॥ कनिष्ठ स्त्रियेसी आलें असे न्हाण । न करी भाषण तिसीं कांहीं ॥३२॥ येऊ म्हणे बाई कैसा हा भ्रतार । करूं मी विचार कैसा आतां ॥३३॥ पहिली ती कांता बिनवी गोरियातें । अंगिकारा इतें स्वामी आतां ॥३४॥ मामानें ही मज घातलीसे आण । दोघींचें पाळण समान करा ॥३५॥ गेला तरी आतां जावो माझा प्राण । न मोडी मी आण विठोबाची ॥३६॥ जाहल्या दोघी श्रमी कपाळ पिटिती । पुरविली पाठी विठोबानें ॥३७॥ वंश बुडविला ह्या मेल्या काळयाने । जळो थोरपण याचें आतां ॥३८॥ बेडे मेले लोक घेती दरुशन । नसावें भाषण यासीं कांहीं ॥३९॥ होवोनियां श्रमी बिसल्या घरांत । काढियेली युक्ति कनिष्ठेनें ॥४०॥ म्हणे बाई आतां मोडूं याची आण । करील भाषण आपणची ॥४१॥ निजतो हा जेथें तेथें हो जाऊन । करावें शयन दोघीनीं तें ॥४२॥ निद्रेमाजी उरस्थळीं याचे हात । ठेऊं अवचित आपूलिया ॥४३॥ मग हा करील सहजचि भाषण । न लगे सांगणें कोणासी तें ॥४४॥ निद्रेमाजी गोरा जाहला तोनिमग्न । दोघींनीं शयन केलें तेथें ॥४५॥ उचलोनियाम कर ठेविले शरीरीं । नाहीं देहावरी गोरा तेथें ॥४६॥ सावध होवोनी पाहियेलें तेणें । अन्याय हातानें केला माझ्या ॥४७॥ विठोबाची माझ्या मोडियेली आण । टाकाबे तोडून हातचि हे ॥४८॥ घेऊनियां शस्त्र तोडियेली कर । आनंदला फार मोरा तेव्हां ॥४९॥ समजलें तेव्हां लोकां त्या सकळां । भक्त हा आगळा देखियेला ॥५०॥ कैसा बाई आतां करावा विचार । बुडाला संसार सर्वस्व हा ॥५१॥ आतां शरण जाऊं तया पांडुरंगा । करील तो चिंता आमुचीय़े ॥५२॥ सांगूं वर्तमान रुक्मिणीजवळी । विनची वनमाळी आम्हांविसी ॥५३॥ शरणागतां हरी नेदीच अंतर । वर्णिताती । शास्त्रें मोठींमोठी ॥५४॥ संत हें गाताती बाई सदोदीत । पाहूं तो अनंत कैसा असे ॥५५॥ दोघी तेव्हां गेल्या रुक्मिणीजवळी । विनविली बाळी रुक्मिणी ॥५६॥ सांगितला तिसी सकळ वृत्तांत । विनवी हा कांत आम्हाविसीं ॥५७॥ ऐकेलग बाई तुझें तो वचन । समजलें पूर्ण आम्हांलागीं ॥५८॥ करीं माते आम्हा येवढा उपकार । न पडे विसर जन्मोजन्मीं ॥५९॥ करुनी प्रार्थना आल्या त्या अश्रमा । उभा होता नामा कीर्तनासी ॥६०॥ आवडीनें गोरा करीत श्रवण । आणीक सज्जन हरिभक्त ॥६१॥ नामयानें टाळीं पिटीली गजरें । गोरियासी कर फुटले ते ॥६२॥ रांगत लेंकरूं आलें तयावेळीं । मातेच्या जवळी आनंदानें ॥६३॥ आलिंगुनी तिणें धरिलें ह्रदयीं । झाली विठाबाई कृपावंत ॥६४॥ आलिंगुनी गोरा बोले मेघ :— शाम । करीं घराश्रम सुखें आतां ॥६५॥ संशयाची जात नको धरूं चित्ता । आण तुज आतां माझी असे ॥६६॥ ऐकोनियां गोरा वर्ते घराश्रमी । लक्ष असे नामीं विठोबाच्या ॥६७॥ ऐसिया संतांचे आठवितां गुण । जाती हे जळोन सर्व दोष ॥६८॥ नामदेव त्यासी करी विनवणी । ठाव ह्या चरणीं तुमचीया ॥६९॥ हेंचि तुम्ही आतां मज द्यावें दान । आठवीन गुण वारंवार ॥७०॥