भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहिला बागुल तो ऐसा । त्याचें नांव म्हणती मासा । शंखासुर वधिला कैसा । चारी वेद आणिले

pahila bagul to aisa | tyachen nanv mhanati masa | shankhasur vadhila kaisa | chari ved anile

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पहिला बागुल तो ऐसा । त्याचें नांव म्हणती मासा । शंखासुर वधिला कैसा । चारी वेद आणिले ॥१॥ कृष्णा राहेरे उगला । नाहीं तर सांगेन त्या बागुला । घुसळणाशी उशीर झाला । रवी सोड गोविंदा ॥धृ॥ दुसरा बागुल बोलती । नाम कांसव म्हणती । जेणें सृष्टि धरली पृष्ठीं । पाय पोटीं धरियेला ॥ कृष्णा० ॥२॥ तिसरा बागुल बोलती । नाम वराह म्हणती । जेणें दाढे धरिली क्षितीं । दैत्य थोर मारिलें ॥ कृष्णा० ॥३॥ चवथा बागुल नरहरी । थोर खांबांत गुरगुरी । दैत्य वधोनी मांडीवरी । भक्त प्रर्‍हाद रक्षिला ॥ कृष्णा० ॥४॥ पांचवा बागुल ब्रम्हाचारी । उभा असे बळिचे द्वारीं । भिक्षा मागोनी निर्धारी । बळिचें द्वार रक्षिलें ॥ कृष्णा० ॥५॥ सहावा बागुल बोलती । नाम परशुराम म्हणती । ज्यानें वधिलें मातेप्रती । पितृवचन मानुनी ॥ कृष्णा० ॥६॥ सातवा बागुल सत्त्वाचा । राम म्हणती दशरथाचा । रावण वधोनी दशमुखांचा । जानकिसी आणिलें ॥ कृष्णा० ॥७॥ आठवा बागुल बोलती । गोकुळीं थोर आहे ख्याती । त्यानें वधिलें कंसाप्रती । देव सुखी केले ॥ कृष्णा० ॥८॥ नववा बागुल बोलती । नांव बौद्ध म्हणती । कोणा न कळे त्याची गती । बौद्धरूपें राहिला ॥ कृष्णा० ॥९॥ होतां कलंकीचा रथू । वेगीं येईंबा धांवतू । नामा म्हणे पंढरिनाथू । बागुल तूं झालासी ॥ कृष्णा० ॥१०॥